संघर्ष यात्रेमुळे सरकारला जाग

0

 फलित समजून घ्या : नारायण राणेंना विखे यांचा टोला

शिर्डी (प्रतिनिधी)- विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या दबावामुळेच राज्य सरकारला संवाद यात्रा काढावी लागली आहे. शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारच्या विरोधात रस्त्यावर आल्यामुळे राज्य सरकारला काही घोषणाही कराव्या लागल्या. संघर्ष यात्रेचे हे फलित ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
मंगळवारी लोणी येथे पत्रकारांशी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी संवाद साधला. संघर्ष यात्रेच्या संदर्भात ज्येष्ठ नेते राणेंनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर विखे पाटील म्हणाले की, हे सरकार मूकबधिर झालं आहे. शेतकर्‍यांचा आक्रोश या सरकारला ऐकू येत नाही, डोळ्यावर पट्टी बांधली असल्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्याही या सरकारला दिसत नाहीत. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने का होईना सरकारला खडबडून जाग आली.
सरकार तूर खरेदीबाबत झटपट निर्णय करू लागले, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाऊन तूर खरेदीचा कोठा वाढवून आणावा लागला.
समृध्दी महामार्ग केवळ मूठभर अधिकार्‍यांसाठी असून, यात शेतकर्‍यांची समृध्दी होणार नाही, बंदूकीचा व कायद्याचा धाक दाखवून जर सरकार काम करणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही विखे पाटील यांनी दिला.
 केवळ घोषणा करुन आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन होणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा द्यायचा असेल तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. त्याला पाठींबा द्यायला आम्ही  तयार आहोत. कर्जमाफी न करता शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची सरकार हमी देणार का? सरकारने शेतीवर केलेली गुंतवणूक आणि जलयुक्त शिवाराच्या मोठ मोठ्या घोषणा केल्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबण्याची हमी सरकार देईल का? असे प्रश्‍न ना, राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करत सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढले.

LEAVE A REPLY

*