संगमनेर तालुक्यात दोन बिबट्यांचा मृत्यू

0
ओझर बुद्रुक येथे प्रवरा उजव्या कालव्याच्या मोरीत मृत अवस्थेत आढळलेला बिबट्या.

आंबीदुमाला, ओझर येथील घटना

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील आंबीदुमाला येथे एका शेतात तर ओझर बुद्रुक शिवारात प्रवरा उजव्या कालव्याच्या मोरीत बिबट्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. एकाच दिवशी दोन बिबटे मृतअवस्थेत आढळून आल्याने वन्यजीवप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

आंबीदुमाला येथील गणेश शिवाजी नरवडे यांच्या गट नंबर 553 मधील शेतात काल सकाळी एका 2 वर्षीय वयाचा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ही माहिती नरवडे यांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक राजे, काळे, वनमजूर फापाळे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून सदर बिबट्याचा मृतदेह कौठे बुद्रुक रोपवाटिकेत आणण्यात आला.

तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिदोरे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल अशी माहिती वनअधिकारी आखाडे यांनी दिली.
आश्‍वी खुर्द प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक शिवारात प्रवरा उजव्या कालव्याच्या ढोलेची मोरीत बिबट्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सध्या प्रवरा उजव्या कालव्यास आवर्तन सुरू आहे. ओझर बुद्रुक-शेडगाव रस्त्यावर गबाजी किसन खेमनर यांच्या क्षेत्रालगत प्रवरा उजव्या कालव्याच्या ढोले मोरीत शिकारीच्या नादात बिबट्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ही घटना साधारण 6 ते 7 दिवसांपूर्वी घडली असल्याची शक्यता आहे. परिसरात कसला तरी उग्र वास येत असल्याने शेतकर्‍यांनी मोरीकडे धाव घेतली असता मोरीत अंदाजे 4 वर्षे वयाचा बिबट्या पाण्यात फुगून वर आल्याचा दिसले. शिकारीच्या नादात बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज परिसरातील शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.

 या परिसरात मुबलक पाणी अन्न व लपन क्षेत्र मोठे असल्याने येथे बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. बिबटे शेतकर्‍यांच्या पशुधनावर व माणसावंर मोठ्या प्रमाणात हल्ले करत असून या भागात अजून बिबट्याचे वास्तव्य आहे. तेव्हा वनविभागाने परिसरात पिंजरे लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतरघटनास्थळीच बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*