संगमनेरच्या पठारभागात गारांसह वादळी पाऊस

0

डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, कांदा, पिकाचे प्रचंड नुकसान

 

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्याच्या पठारभागातील बोटा, घारगाव, अकलापूर, केळेवाडी परिसराला शनिवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारांच्या पावसाने चांगलेच झोडपले. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या डाळिंब, कांदा, द्राक्ष, टोमॅटो पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल रविवारी सकाळी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

 
संगमनेर तालुक्यातील केळेवाडी हे जवळपास पूर्ण बागायती गाव आहे. येथील डाळिंब, द्राक्षाच्या बागा, टोमॅटो व कांदा पिकांचे सुमारे दोन तास चाललेल्या पावसाने व त्यात गारांच्या मार्‍यामुळे मोठे नुकसान झाले. या पावसाने अनेक शेतकर्‍यांच्या उभ्या फळबागांमधील फळे गळून पडली. पाने व फुलोरा झडला गेला आहे. केळेवाडी परिसरातील सर्वच पिकांचे मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. या पावसाने परिसरातील सर्वच छोटे-मोठे केटीवेअर पूर्ण भरले असून ती वाहू लागली आहेत. वादळी वार्‍यामुळे काहींच्या घरांवरील पत्रे उडाली. संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी या भागाशी संपर्क साधून माहिती घेतली.

 
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची चांगलीच धावपळ उडाली. अनेकांच्या शेतात कांदा काढून तो गोण्यांमध्ये भरण्याच्या तयारीत होता तर काही शेतकर्‍यांनी गोण्या भरून ठेवल्या होत्या. पाऊस येताच शेतकर्‍यांची धावपळ उडाली. मात्र पावसाचे थैमान इतके होते की क्षणात सर्वत्र पाणीच पाणी झाले. वादळी वार्‍यामुळे कांद्यावर टाकलेले प्लॅस्टिक उडून गेले त्यामुळे कांदा उघडा पडला. झालेल्या पावसाने कांद्याचे नुकसान झाले.

 
अकलापूर व परिसरातील माळवाडी, आभाळवाडी, येलखोप येथे कांदा, डाळिंब, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बोटा, केळेवाडी, कुरकुंडी येथेही पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अकलापूर ते बोटा रस्त्यावरील केळेवाडी पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेले हे थैमान सुमारे दोन तास सुरू होते. या वादळाने रस्त्याच्या कडेच्या बर्‍याच झाडांचाही बळी घेतला. वार्‍याच्या मार्‍याने झाडे उन्मळून पडली. वादळी वारे सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला. तर वादळी वार्‍यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले. त्यामुळे बोटा परिसरातील सर्वच गावांमधील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. बबन कुर्‍हाडे (केळेवाडी) यांच्या शेततळ्यातील कागद उडून गेला.

 

त्यामुळे त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. रखमा पाडेकर यांच्या डाळिंब, टोमॅटो पिकांचे प्रचंड नुकसान झाले. रावसाहेब लामखडे यांच्या घराकडे जाणारी पांध पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. तर घारगाव व नांदूरखंदरमाळ परिसरात काही प्रमाणात पाऊस झाला.केळेवाडी परिसरातील नुकसानग्रस्त भागाची काल रविवारी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती अजय फटांगरे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी पाहणी केली.

 
नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना खासदार व कृषी सभापतींनी अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी सरपंच विकास शेळके, बबन लमाखडे, संतोष देवकर, बबन कुर्‍हाडे, राजू लामखडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

 

केळेवाडी परिसरात गारपिटीचा फटका बसून शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी अधिकार्‍यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करावा, तातडीने शासकीय मदत शेतकर्‍याला द्या, शेतकर्‍याला योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी सरकारकडे करणार आहे.
ः खासदार सदाशिव लोखंडे

LEAVE A REPLY

*