श्रीरामपूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काहीच निर्णय नाही

0

पालिकेच्या हद्दीत असलेल्या रस्ता हस्तांतरण,विविध विषयांवर
सभा गाजली

श्रीरामपूर पालिकेच्या इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तात सर्वसाधारण सभा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- पालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिकेच्या हद्दीत असलेल्या रस्ता हस्तांतरणाबाबत कोणताही निर्णय झाला नाही मात्र दारूबंदी व्हावी म्हणून अनेक नगरसेवकांनी बाकडे वाजवून स्वागत केले व त्यास पाठिंबा दिला. मात्र याप्रकरणी काहीच निर्णय न झाल्यामुळे सर्वांपुढे तेच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेच्या सुमारे साडेपाच तास चाललेल्या सर्वसाधारण सभेत रस्ता हस्तांतरणाबाबत काहीच निर्णय झाला नाही. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक या होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक उपस्थित होते.
यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे यांच्या वाढदिवसाला दिलेल्या टँकरवरील त्यांचे नाव तसेच श्रीनिवास बिहाणी यांच्या आईच्या स्मरणार्थ दिलेल्या स्वर्गरथावरील नाव का खोडले? असा सवाल नगरसेवक संजय फंड यांनी उपस्थित केला. त्यावर आचारसंहितेच्या काळात सदर नाव खोडण्यात आल्याचा खुलासा पालिकेच्यावतीने करण्यात आला. मात्र त्यावर विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यावर पुन्हा नाव टाकण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्याधिकारी यांनी दिले.
गदिया यांच्या प्लॉटवरून अंजुम शेख, संजय फंड व श्रीनिवास बिहाणी यांच्यात वादळी चर्चा झाली. 14 गुंठे ज्याचे आहेत. तो 47 गुंठ्याचे आरक्षण उठविण्याचा अर्ज कसा करतो? असा सवाल बिहाणी यांनी उपस्थित केला. यापैकी 14 गुंठे हे पालिकेच्या एका पदाधिकार्‍याने घेतल्याचा आरोपही बिहाणी यांनी केला. त्यावर अंजुम शेख यांनी नाव घेऊन बोला, असे त्यांना आव्हान केले. महिला दिनाच्या कार्यक्रमाला आम्हाला का बोलाविले नाही? असा सवाल नगरसेविका सौ. चंद्रकलाताई डोळस, सौ. परदेशी यांनी केला त्यावर पालिकेचा कार्यक्रम हा आपलाच असून त्यात सहभागी व्हायला बोलवायला कशाला पाहिजे? मी वैयक्तिक कोणालाही फोन केला नाही. असे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केले.
अंडरग्राउंड गटारीच्या कामाचे पाच कोटीचे बील काढले कसे? असा सवाल संजय फंड यांनी उपस्थित केल्याने त्यावर मागच्या सर्वसाधारण सभेत आपण अंडरग्राउंडच्या गटारीच्या कामाविषयी टीका केली होती. मात्र या कामाचे बिल देण्याची माझी इच्छा नव्हती परंतु जर तसे केले नसते तर सदर योजना बंद पडली असती. त्याचा शहराच्या विकासावर मोठा परिणाम झाला असता. असे सांगत मी केलेल्या 2 कोटी 11 लाख रुपयाच्या बिलासंदर्भात माझा आक्षेप आजही आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
याच विषयावर अंजुम शेख म्हणाले की, अंडरग्राउंडच्या गटारीच्या कामाविषयी आम्ही केलेले आरोप आजही कायम आहेत. 2 कोटी 11 लाख साऊथ झोनला कसे दिले. असा आरोप त्यांनी केला. यावर मुजफ्फर शेख यांनी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला मात्र अंजुम शेख यांनी मी जबाबदार पध्दतीने आरोप करत असल्याचे मुजफ्फर शेख यांना सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तालुक्यातील कार्यकर्त्यांना निधी देण्यात आला. त्यांचा शहराशी काय संबध? असा सवाल प्रकाश ढोकणे यानी उपस्थित केला. त्यावर आपण शहराबरोबर तालुक्यातील काही भागात वीज आणि पाणी पुरविले आहे. त्यामुळे जयंती उत्सवाला निधी दिला त्यात वावगे काय? असे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले. त्यावर श्यामलिंग शिंदे यांच्यासह अनेकांनी मागणी केल्यानंतर ढोकणे यांनी पुढच्या वेळेला निधी देण्याचा विचार केला जाईल असे सांगितले.

नगराध्यक्षा व मुजफ्फर शेख
यांच्यात बाचाबाची
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निधीबाबत नगरसेवक मुजफ्फर शेख हे बोलू लागले असता नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु शेख हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने नगराध्यक्षांनी तुम्ही स्वीकृत आहात अशी आठवण करून दिली. त्यावर मुजफ्फर शेख यांनी संतप्त होऊन आदिकही मागच्या दाराने गेले होते. असा त्यांनी उल्लेख केला. त्यावर नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी माझ्या वडिलांचे नाव घेण्याची तुमची पात्रता नाही. उगाचच त्यांचे नाव घेऊ नका, त्यांनी या शहरासाठी खूप काही केले, त्यामुळेच येथील नागरिकांनी मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले आहे. जनतेने मला माझी जागा दाखविली आहे. आणि तुम्हालाही तुमची, त्यामुळेच तुम्हाला मागच्या दाराने यावे लागले, अशा शब्दांत आदिक यांनी शेख यांना सुनावले.

कामाविनाच 79 लाखांची बिले कशी काढली? ः शेख
पालिका निवडणुकीच्या अगोदर 8 नोव्हेंबरला 79 लाखांची बिले कामाविनाच काढल्याचा आरोप अंजुम शेख यांनी केला. माझ्याकडे त्याचे पुरावे असल्याचे सांगत त्यांनी कुकरेजा बिल्डिंग ते बाजारतळ पर्यंतच्या रस्त्यासाठी 16 लाख 75 हजार, गिरमे चौक ते गायकवाड वस्ती ते टिळकनगर रोड 44 लाख, सेंट्रल गोडावून ते मराठा बोर्डिंग ते दमानी हॉस्पिटल 22 लाख, शिवाजी चौक ते मौलाना आझाद चौक 12 लाख, सरस्वती कॉलनी ते अडसुरे बंगला 38 लाख या रस्त्याची कामे न करता ही बिले तत्कालिन सत्ताधार्‍यांनी अदा केल्याचा आरोप अंजुम शेख यांनी केला. कामे न करता निवडणुकीपूर्वीच दिलेले हे पैसे असून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशी मागणी त्यांनी केली. 

कॅनॉलकडेची जागा शेतकर्‍यांसाठी
आरक्षित ः आदिक
बेलापूर रोडलगत कॅनॉलच्या कडेला काही भाजीविक्रेते बसतात त्यांच्याकडून दररोज 100 रुपयाप्रमाणे वसुली केली जाते, अन् टपरीधारकांकडून 20 रुपये असा अन्याय का? असा सवाल श्रीनिवास बिहाणी यांनी केला यावर नगराध्यक्षा आदिक यांनी सदर जागा शेतकर्‍यांसाठी दिवसातून दोन तास आरक्षित करण्यात आली असून ज्यांच्याकडून 100 रुपयाप्रमाणे वसुली केली जाते ते शेतकरी नसून व्यापारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरवाजा तोडणार्‍यावर गुन्हा दाखल करणार ः नगराध्यक्षा अनुराधा आदिक
प्रेक्षक गॅलरीचा दरवाजा तोडताना मी पाहिलेले आहे. त्याला मी ओळखते, त्यामुळे दरवाजा तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.

दरवाजा तोडलाप्रकरण, नगरसेवकांत हमरीतुमरी  श्रीरामपूर (प्रतिनिधी)- पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्यावेळी प्रेक्षक गॅलरीचा दरवाजा धक्का मारून तोडल्यानेे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांत चांगलीच हमरीतुमरी झाली. एवढेच नव्हे तर दोन्ही गटाचे नगरसेवक एकमेकांवर धावून गेले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तत्काळ या घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आली. तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नंतर सभा पार पडली.

काल सकाळी श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी प्रेक्षक गॅलरीत कोणत्याही नागरिकांनी बसून न देता गॅलरीचे दरवाजे लावून घेण्यात आले. सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी प्रेक्षक गॅलरीत येण्यासाठी बाहेरून दरवाजा वाजविण्यास सुरुवात केली. धक्के मारून मारून गॅलरीचा दरवाजा तोडल्याने सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांत चांगलीच बाचाबाची झाली. त्यात नगरसेवक किरण लुनिया यांनी दरवाजा उघडल्याप्रकरणी सिध्दार्थ फंड याच्यावर गुन्हा दखल करा, अशी मागणी केल्याने संतप्त झालेले नगरसेवक संजय फंड आणि त्यांचे सहकारी नगरसेवकांनी जोरदार विरोध करत आरोप करणार्‍यांवर ते धावून गेले. एका बाजूला मुजफ्फर शेख, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, मुख्तार शाह तर दुसर्‍या बाजूला किरण लुणिया, राजेंद्र पवार, बाळासाहेब गांगड, अंजुम शेख, राजेश अलघ हे एकमेकांच्या अंगावर आले.
काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यात काहींनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून श्रीरामपूर शहर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सर्वसाधारण सभा संपेपर्यंत पलिकेत पोलीस ठाण मांडून होते.

 

LEAVE A REPLY

*