श्रीगोंद्यात दोन गटात धुमश्‍चक्री, माजी नगराध्यक्ष जखमी

0

ग्रामीण रूग्णालय परिसरातील घटना, 20 जणांवर गुन्हा दाखल 

 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा शहरात गेल्या आठ दिवसांपासून होले आणि बोरुडे या दोन गटात सुरु असलेल्या जमिनीच्या व पाण्याच्या वादातून काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.
याबाबत श्रीगोंदा पोलिसात फिर्याद दिल्या नंतर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेलेल्या दोन्ही गटाचे महिला आणि पुरुष यांच्यात वादावादी झाली. यात झालेल्या सिनेस्टाइल मारामारीनंतर ग्रामीण रूग्णालयाला छावणीचे रूप आले होते. या घटनेत माहिती मिळूनही पोलीस उशिरा आल्याने तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत इतर रुग्णांचे मात्र हाल झाले. याबाबत दोन्ही गटाच्या वीस ते पंचवीस जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 
श्रीगोंदा शहरातील माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे व सिंधुबाई गुलाब होले यांच्यात चार दिवसापूर्वी जमिनीच्या वादातून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या होत्या. दोन गटांत झालेल्या मारामारीची घटना घडली असताना काल पुन्हा पाण्याच्या वादातून बोरुडे आणि होले गटात तुफान मारामारी झाली.

 

यामध्ये माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोन्ही गटाची माणसे एकाचवेळी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आली. मात्र जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी पाठवले असता दोन्ही गट पुन्हा श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात समोरासमोर आल्याने तेथेच तब्बल अर्धा तास तुफान मारामारी झाली. या घटनेची माहिती उपस्थितांनी पोलीस ठाण्यात कळवली. मात्र माहिती मिळूनही पोलीस उशिरा आल्याने तो पर्यंत रुग्णालयाच्या आवारात गोंधळ सुरू होता.

 

याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी दोन्ही गटाच्या 15 ते 20 जणांवर सार्वजनिक ठिकाणी अशांतता पसरविणे, मारामारी करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला. यामध्ये बोरुडे गटाचे गणेश बोरुडे, नंदकुमार बोरुडे, अ‍ॅड. इमरान इनामदार, कारभारी बोरुडे, दीपाली बोरुडे, रामभाऊ बोरुडे, शुभलक्षमी बोरुडे यांच्यावर तर होफे गटाच्या नाना होले, विनोद होले यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*