शेतात अडीच लाखांची विदेशी दारू जप्त

0

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगावची घटना । आरोपी व मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू

 

भोकर/माळवाडगाव (वार्ताहर) – राज्यात सर्वत्र पाचशे मिटरच्या अंतरावरील दारूची दुकाने बंद झाल्याने मद्यपींची अडचण होत असताना काल श्रीरामपूर तालुका पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात एका शेतकर्‍यांच्या राहत्या घराजवळील शेडमध्ये सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे 245 विदेशी दारूचे बॉक्स पकडल्याने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. येथील आरोपी पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश आले असले तरी पोलीस तपासात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात भोकर-मुठेवाडगाव शिवेलगत मुठेवाडगाव शिवारात गट नं.126 मध्ये वस्ती करून राहत असलेले दत्तात्रय सूर्यभान चौधरी यांच्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी दारूचे े 245 बॉक्स सापडले. या छाप्याच्यावेळी चौधरी यांच्या घरी कुणीही नव्हते मात्र काही वेळानंतर त्यांच्या पत्नी पुष्पा या आल्या असता त्यांनी यात काय आहे? आणि हे कुणाचे आहे? हे माहीत नाही असे सांगितल्याने पोलिसांनी केवळ दारू ताब्यात घेतली आहे.

 

मुठेवाडगाव शिवारात सापडलेली दारू ही गोवा येथील असून त्यावर रिअल व्हीस्की असे नाव आहे. प्रत्येकी 750 मी ली याप्रमाणे एका बॉक्समध्ये 12 बाटल्या आहेत. असे 245 बॉक्स म्हणजे 2940 बाटल्या विदेशी दारू असा एकूण दोन लाख पस्तीस हजार दोनशे रुपयांचा दारूसाठा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

 
याप्रकरणी काल सायंकाळी उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईने नागरीकांत समाधान व्यक्त केले जात असून तालुका पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील यावर्षातील तसेच नव्याने हजर झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शर्मा यांच्या आगमनानंतरची ही पहिलीच कारवाई आहे.

 

यात लवकरच मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याचा विश्‍वास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी सांगितले. या कामगिरीत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी डेरे, प्रकाश वाघमारे, नामदेव पेटारे व पोलीस नाईक विकास साळवे, पोलीस पाटील दत्तात्रय मुठेे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सोपानराव मुठे यांनी विशेष कामगिरी बजावली.

 

गावापासून सुमारे 2 की.मी. अंतरावर चौधरी यांची शेती आहे. या परिसरात शक्यतो कुणीच फिरकत नाही. त्यामुळे या निर्जन परिसराचा फायदा घेत ही दारू लपविली असावी. ह्या दारूची कुठे विक्री होणार होती? ती अशीच बाटलीने विकली जाणार होती की लुज करून किरकोळ विक्रीसाठी वापरली जाणार होती? या दारूचा मूळ मालक कोण? ही दारू कोठून आली आणि कोठे जाणार होती? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. याचा शोध आता तालुका पोलीस घेत आहेत.

 

येथील पोलीस पाटील दत्तात्रय मुठे व तंटामुक्तीचे अध्यक्ष सोपानराव मुठे यांच्या मदतीने गावातील एक टेम्पो उपलब्ध झाला तर त्याला चालक नव्हता अखेर पोलीस चालक संभाजी डेरे यांनी स्वत: सारथीचे काम केले. त्यानंतर दारूचे बॉक्स टेम्पोत टाकण्यासाठी हमाल मिळेना अखेर नाईलाजास्तव पोलीस पाटील दत्तात्रय मुठे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सोपानराव मुठे यांच्यासह पोलीस हे.काँ. संभाजी डेरे, प्रकाश वाघमारे, नामदेव पेटारे व पो.ना. विकास साळवे आदींनी स्वत: ही दारू टेम्पोत टाकून तालुका पोलीस ठाण्यात पोहोच झाली.

LEAVE A REPLY

*