शेतकर्‍यांच्या एकत्रित भगीरथ प्रयत्नांना यश

0

नदी प्रवाहाच्या विरुध्द दिशेने 3 कि.मी.वर आणले पाणी

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- शेतातील लाख मोलाची उभी पिके जगविण्यासाठी पेडगांव व परिसरातील शेतकर्‍यांनी भीमा नदीपात्रातील पाणी प्रवाहाच्या विरुध्द दिशेने तब्बल तीन किलोमीटर अंतरावर आणले. या पाण्यामुळे परिसरातील जवळपास आठ गावांमधील शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांना संजीवनी मिळाली आहे.शिवाय शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे संभाव्य नुकसान यामुळे टळले आहे. इच्छाशक्ती व लोक सहभागातून साकारलेल्या या प्रयोगाने शेतकर्‍यांसमोर व सरकारसमोरही एक नवा आदर्श उभा केला आहे.
सविस्तर असे की, मागील काही वर्षांच्या दुष्काळांमुळे येथील शेती व शेतकरी संकटात सापडला आहे. शेतातील उभी पिके जळाल्याने शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर मागील पावसाळ्यात समाधानकारक पाऊस तर झालाच होता पण सगळी धरणेही शंभर टक्के भरली होती.त्यामुळे शेतकर्‍यांनी पूर्वीचा कर्जाचा बोजा शिरावर असतानाही मोठ्या अपेक्षेने ऊस,फळबागा व चारा पिके घेतली होती.
धरणे भरली तरी धरणातील पाणी वितरणाचे नियोजन फसले अन् ऐन उन्हाळ्यात शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी मिळण्याची शक्यता धुसर झाली.तालुक्यातील काही भागाचा अपवाद वगळता बहुतांश भागात हेच चित्र होते व आहे.भीमा नदीकाठचा बागायत पट्टा ही याला अपवाद नव्हता.
भीमा नदीपात्रात भामा आसखेड धरणाचे पाणी सोडण्याच्या घोषणा तालुक्याच्या आजी माजी आमदार,नगर व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनीही केली पण हे पाणी कुठे मुरले हे कोणीच ठामपणे सांगितले नाही.पाण्याबाबतची केवळ आश्वासने मिळाली पण पाणी नाही अशी स्थिती नदीकाठच्या विशेषतः अजनूज व पेडगाव येथील परिसरातील शेतकर्‍यांची झाली.मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके जळण्याच्या भीतीने येथील शेतक-यांची झोपच उडाली..
उभी पिके जगविण्यासाठी काही तरी केलेच पाहिजे.करावेच लागेल…या विचारांनी पेडगाव, चिखलठाणवाडी, कणसेवाडी, आधोरेवाडी, चोराची वाडी, नवनाथ नगर, टाकळी कडेवळीत, शेडगाव येथील शेतकर्‍यांना एकत्र आणले. नागवडे कारखान्याचे संचालक राजकुमार पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी यासाठी पुढाकार घेतला.
विचारमंथनातून अखेर या शेतकर्‍यांना एक अनोखी व अभिनव कल्पना सुचली.पेडगाव येथील बंधार्‍याच्या खालच्या भागात उजनी धरणाच्या बॅकवॉटरचे नदीपात्रात असलेले पाणी उलट्या दिशेने 3 कि.मी.अंतरावर पेडगांव बंधार्‍यात आणण्याचा खर्चिक व धाडसी निर्णय घेतला.लोकवर्गणी व लोकसहभागाची तयारी सर्वच लाभधारक शेतकर्‍यांनी स्वतःहून केली अन् वर्गणी जमाही झाली.शेतकर्‍यांच्या या स्तुत्य प्रयत्नांना मोठा हातभार लावला तो नागवडे कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव नागवडे व अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी या शेतक-यांना शंभर अश्वशक्तीचा वीजपंप उपलब्ध करुन दिला.
कारखान्याचा वीजपंप,लोकवर्गणीच्या रकमेतून भाडेतत्वावर आणलेले 35 अश्वशक्तीचे दोन पंप ,दहा बोटी व 340 अश्वशक्तीचे जनित्र या यंत्रसामुग्रीचा वापर करीत बॅकवॉटरचे पाणी नदीपात्रातुनच प्रवाहाच्या उलट्या दिशेने आणण्याची सुरुवात या शेतक-यांनी 26 एप्रिलला केली. जनित्र,पाणी उपसा करणारे पंप,बोटी या यंत्रांना दिवसभरात जवळपास हजार लिटर डिझेल खर्च होई.शिवाय बोटी, जनित्र चालकांचे वेतन , जनित्राचे व पंपांचे भाडे असा हजारो रुपये प्रतिदिन खर्च होत होता.
पण शेतकर्‍यांनी संघटीत अखंडीतपणे प्रयत्न सुरु ठेवले.त्यासाठी वेळेचे व कामांचे नियोजन व वाटप केले गेले. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडली. तब्बल आठवडाभराच्या अविरत प्रयत्नांनंतर 2 मे रोजी हे पाणी 3 कि.मी अंतरावर उलट्या दिशेने पेडगावच्या बंधा-यात पोहचले…आजअखेर हे पाणी येत आहे.आणखी काही दिवस हा प्रयोग सुरु ठेवला जाणार असून त्यामुळे पुरेसे पाणी साठवले जाणार आहे.
पेडगाव येथील बंधा-यातून पाणी गळती होवू नये यासाठीही स्वतंत्र उपाययोजना केली गेली.बंधा-यात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत शेतक-यांनी पाणी उपसा न करण्याचा निर्णय झाला होता.या निर्णयाचे सर्व शेतक-यांनी काटेकोर पालन केले.दौंड तालुक्यातील पेडगांव व बंधा-यांच्या खालच्या भागातील शेतकर्‍यांनीही या कामात आपापले योगदान देत शेतकरी बांधवांच्या प्रयत्नांना साथ दिली.
पेडगांव व परिसरातील शेतकर्‍यांनी नदीपात्रात पाणी सोडले जाण्यासाठी प्रयत्न केले.पण शासन यंत्रणेची साचेबध्द उत्तरे व नेत्यांची पोकळ आश्वासने यावर अवलंबून न रहाता स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करुन उभ्या पिकांना पाणी मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.पेडगाव बंधार्‍यात पाणी आल्यामुळे जवळपास आठ गावांतील शेतकर्‍यांच्या ऊस,फळबागा व चारापिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी मिळणार आहे.परिणामी या पिकांना एकप्रकारे संजीवनी मिळणार आहे.
शिवाय शेकडो शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले आहे. या पाण्यामुळे परिसरातील हजारो एकरावरील पिके जगण्याचा मार्ग मोकळा झाला.परिसरातील शेतकर्‍यांनी इच्छाशक्ती व सामुहीक प्रयत्नांच्या बळावर जिद्द व चिकाटीने काम करुन स्वतःचा प्रश्न सोडविण्याचा एक आदर्श व यशस्वी प्रयोग करुन अन्य भागातील शेतकरी व सरकारसमोरही नवा आदर्श ठेवला आहे.

LEAVE A REPLY

*