शेतकर्‍यांची थट्टा, कृषी विभाग म्हणतो चार हजार तर महसूल म्हणतो पाचशे हेक्टरचे नुकसान

0

नाशिक/अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकरी पार भेदरला आहे.

अशातच रविवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात झालेल्या वादळी गारपिटीने सुमारे पाचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल खात्याने व्यक्त केला.

तर कृषी विभागाने जिल्ह्यात जवळपास चार हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसल्याचे म्हटले आहे.

या दोन यंत्रणांच्या गोंधळामुळे शेतकरीही गोंधळात पडला आहे.

रविवारी अचानक अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.

वादळी वारा, विजेचा कडकडाट करीत गारांसह कोसळलेल्या या पावसामुळे थेट जीवित हानी झाली नसली तरी शेतकर्‍यांचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे.

अगोदरच शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या शेतकर्‍याच्या शेतातील उभे पीक व खळ्यात साठवून ठेवलेला माल या पावसात पूर्णपणे नष्ट झाला.

वार्‍यांमुळे द्राक्षबागा कोसळल्या तर काढणीवर आलेली द्राक्षे जमिनीवर गळून पडली. कांदा, डाळींब, टोमॅटो, मिरची या नगदी पिकांनाही जोरदार फटका बसला आहे.

या नुकसानीची दखल घेत सोमवारी महसूल खात्याने तलाठी, ग—ामसेवकांना पीक पंचनाम्याचे आदेश दिले असता प्रथमदर्शनी सुमारे पाचशे हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज आहे.

या पावसामुळे निफाड व इगतपुरी तालुक्यातील प्रत्येकी सुमारे 33 टक्के पिकांचे नुकसान झाले.

तर कृषी विभागाने कृषी सहाय्यकांच्या मदतीने घेतलेल्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्हात जवळपास चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सर्वाधिक नुकसान इगतपूर, निफाड व बागलाणमध्ये झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दोन यंत्रणांकडून झालेल्या प्राथमिक अंदाजामुळे शेतकरी गोंधळात सापडला आहे.

त्यामुळे सर्वच शेतीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हे पंचनामे झाल्यानंतर तीन ते चार दिवसात नुकसानीची खरी वस्तुस्थिती समोर येईल.

LEAVE A REPLY

*