शेतकरी पिक विमा योजनेत श्रीरामपूर तालुक्यातून एकही शेतकरी पात्र नाही

0

कृषी अधिकार्‍यांनी जबाबदारी झिडकारली; शेतकर्‍यांमध्ये संताप; ज्वारी पिकासाठीच्या विम्याची रक्कम बँकेत वर्ग

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- खरीप 2016 च्या हंगामात श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा विमा उतरविलेला असतानाही या हंगामात या योजनेत तालुक्यातून एकही शेतकरी पात्र ठरला नसल्याचे कृषी अधिकार्‍यांनी सांगताच शेतकरी संतापले. यावेळी कृषी अधिकार्‍यांनी जबाबदारी झिडकारली तर विमा कंपनीचे एकही प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नसल्यामुळे आणखीनच शंकेची पाल चुकचुकली. याप्रश्‍नी या बैठकीत काहीच निर्णय होवू न शकल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. ज्वारी पिकासाठीच्या विम्याची रक्कम बँकेत शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली असल्याचेही कृषी अधिकार्‍यांनी सांगितले.

 
शेतकरी विमा योजनेबाबत कृषी विभागाने काल प्रांताधिकार्‍यांच्या दालनात तहसीलदार सुभाष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी आमदार भाऊसाहेब कांबळे, पंचायत समितीचे सभापती दिपक पटारे, तालुका कृषी अधिकारी श्री. शिरसाठ, कृषी अधिकारी श्री. जोशी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अधिकारी श्री. पटारे, शेतकरी संघटनेचे अनिल औताडे, बाजार समितीचे संचालक राधाकिसन आहेर, विश्‍वनाथ मुठे, गिरीधर आसने आदी उपस्थित होते.

 
श्रीरामपूर तालुक्यातील खरीप 2016 च्या अंतर्गत शेतकर्‍यांकडून सोयाबीन, तूर, गहू, कांदा या पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. परंतु या हंगामात शासनाकडून श्रीरामपूर तालुक्यातील एकही शेतकरी पात्र ठरला नाही तर फक्त ज्वारी या पिकासाठी विमा मंजूर करण्यात आला. सदरची रक्कम कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्री. शिरसाठ यांनी सांगितली.

 
रब्बी 2015-2016 मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना गहू, हरभरा, कांदा या पिकांचे आतोनात नुकसान झाले. याबाबतही या बैठकीत कोणत्याही प्रकारे निराकरण झाले नाही. तसेच खरीप 2016 मधील सोयाबीन पिकांचे फुलगळ झालेमुळे व अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर नकुसान झाले आहे. त्यावेळी सर्कलनिहाय, पिकनिहाय प्रातिनिधीक स्वरुपात दोन पंचनामे केले होते. हंगामामधील नुकसान भरपाई विम्यामधून मिळाली नाही त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी युवराज जगताप, निवृत्ती बडाख, बाळासाहेब दौंड आदी उपस्थित होते.

 

ज्या शेतकर्‍यांनी पिक विमा भरला त्या शेतकर्‍यांना दुष्काळाचे अनुदान मिळणार नाही. आणि ज्या शेतकर्‍यांनी पिक विम्याचा हप्ता भरला नाही त्या शेतकर्‍यांना ज्या पात्र पिकाच्या उत्पादनाच्या निम्मे दुष्काळाचे अनुदान मिळणार आहे. म्हणजेच त्या शेतकर्‍यांना पात्र पिकाच्या पिक विम्याच्या निम्म्याच रकमा मिळणार असल्याचा अध्यादेश शासनाने काढलेला होता.  तो अध्यादेश काल तहसीलदारांनी शेतकर्‍यांना वाचून दाखविला.

 

यावेळी कृषी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्याप्रति जबाबदारी झिडकारत शेतकर्‍यांनी आता विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत परंतु शेतकर्‍यांनी मध्येच आपण शेतकर्‍यांबाजूने न बोलता आपणच विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल का करत नाही, असे सांगितले असता ते आमचे काम नाही असे सांगत जबाबदारी झिडकारली. ज्यावेळी विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल कराल त्यावेळी आम्हालाही सहआरोपी करा असे सांगितले. 

 

ज्या शेतकर्‍यांच्या पिक विमा उतरविला आहे त्या शेतकर्‍यांना पिक विम्याचा लाभ मिळणे गरजेचे आहे. त्या पिकांच्या पंचनाम्याचे निकष दाखवून या तालुक्यातील शेतकर्‍यांवर अन्यायच केला आहे. त्यामुळे कृषी विभागाने आपल्या वरिष्ठांशी बोलून बैठक आयोजित करावेत व या शेतकर्‍यांना पिक विम्याचा लाभ कसा मिळेल याबाबत सर्व बाबी निश्‍चित कराव्यात अन्यथा शेतकर्‍यांचा पिक विम्यावर विश्‍वास राहणार नाही, असेही आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केली आहे.
आमदार भाऊसाहेब कांबळे

 

या तालुक्यातील शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या प्रचार प्रसारामुळे शेतकर्‍यांनी पिकांचे विमे उतरविले होते. परंतु त्याच जोरावर कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करुन त्यांना पिक विम्याचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु या अधिकार्‍यांनी विमा कंपन्यांची बाजू घेवून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्याची भाषा केली. आपल्याकडून या बैठकीत निर्णय द्यावा अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही असा इशारा पंचायत समितीचे सभापती दिपक पटारे यांनी दिला.
दिपक पटारे, सभापती, पंचायत समिती

LEAVE A REPLY

*