शिक्षण विभाग भरणार गोपनीय अभिलेखे

0

गणोरे (वार्ताहर) – शिक्षण विभागासाठी निश्तिच केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित केलेल्या कार्यक्रमांची अमंलबजावणी कशाप्रकारे करण्यात आली आहे, त्यात कितपत यश मिळाले, त्यावर गोपनीय अभिलेखे भरले जाणार आहेत.त्यामुळे राज्यातील शाळांच्या उपक्रमांच्या अमंलबजावणीत गतिमानता येण्याची शक्यता आहे.

राज्यातील शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्रपणे मूल्यांकन विकसित करण्यात आले आहे. या आदेशाची अमंलबजावणी सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.
राज्यातील शिक्षण विभागातील गट अ आणि ब वर्गातील कार्यमूल्यमापन अहवाल भरण्यासाठी गुणांकन पध्दती विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी उद्दिष्टे आणि गुणांकन तक्ता विकसित करण्यात आला आहे.

त्यानुसार सन 2016-17 मध्ये प्रगत महाराष्ट्रांतर्गत 10 गुण प्राप्त करावयाचे असल्यास 50 टक्क्यांपेक्षा अधिक शाळा या प्रगत करणे, 25 टक्के उच्च प्राथमिक शाळा प्रगत करणे, 20 टक्के माध्यमिक शाळा प्रगत करणे अपेक्षित आहे. गुणदानाकरिता सहा टप्पे विकसित करण्यात आले आहेत.

किमान गुण पाच असून 42 टक्के प्राथमिक, 17 टक्के उच्च प्राथमिक, टक्केपेक्षा कमी माध्यमिक शाळा असल्यास अवघे पाच गुण प्राप्त करता येणार आहेत. तर शाळा सिध्दी करिता कार्यक्षेत्रातील अधिक शाळा अ दर्जाच्या, शाळामध्ये हॅण्डवॉश स्टेशन, 90 टक्क्यांपेक्षा अधिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, व शौचालयाची व्यवस्था असणे अपेक्षित आहे.

या करिता दहा गुण राखून ठेवण्यात आले आहेत. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण 0.4 टक्केपेक्षा कमी असल्यास दहा गुण, शंभर टक्के डिजीटल स्कूल असल्यास दहा गुण, विद्यार्थ्यांची गळती प्राथमिक स्तर 0.4, उच्च प्राथमिक स्तरावर 0.8, माध्यमिक स्तरावर 1.2 टक्के पेक्षा कमी असल्यास दहा गुण मिळणार आहेत.

कार्यालयीन कामकाज संदर्भात स्थानिक लेखातील आक्षेप निकाली काढलेले असल्यास, महालेखाकारांचे आक्षेप 90 टक्क्यापेक्षा अधिक प्रकरणात पूर्ण झाले असल्यासं दहा गुण मिळतील. सेवानिवृतीचे प्रकरणी शून्य टक्के प्रलंबित असल्यास, शासनाचे वतीने न्यायालयीन कामकाजात 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणात पूर्तता झाली असल्यास दहा गुण मिळणार आहे.
एकूण निर्धारीत गुणांपैकी 9 पेक्षा अधिक गुण मिळाल्यास अ +, 6 ते 8 गुण मिळाल्यास अ, 5 ते 3 गुण प्राप्त असल्यास ब व 2 ते 1 गुण मिळाल्यास क असा शेरा नोंदविला जाणार आहे. तर प्रशिक्षण शाखेतील प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेची प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विद्या प्राधिकरण मधील अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र गुणांकन विकसित करण्याची जबाबदारी विद्या परिषदेकडे देण्यात आली आहे.

याप्रमाणे निर्धारीत उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत, त्यावर अधिकारी वर्गाचे गोपनीय अभिलेखे नोंदविले जाणार आहेत. त्यामुळे राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी निश्चित मदत होण्याची आशा आहे. सरकारने टाकलेले शिक्षणा विभागासाठीचे पाऊल इतर विभागातील अधिकार्‍यांना देखील टाकले जावे अशी मागणी पुढे येत आहे.

शिक्षण विभागातील अधिकार्‍यांवर उद्दिष्टानुसार साध्यतेची जबाबदारी
अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शाळांच्या गुणवत्तेवर ठरणार श्रेणी.
राज्याच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी टाकले पाऊल
दहा क्षेत्रात 90 टक्के यश मिळल्यास ‘अ+’चा शेरा नोंदविला जाणार.
चालू शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी
प्रशिक्षण शाखेकरिता देखील गोपनीय अभिलेखे विकसित करण्यात येणार

LEAVE A REPLY

*