शाहरूख खानच्या भेटीसाठी मुलींचे घरातून पलायन!

0

वास्तविक शाहरूखची एक झलक बघण्यासाठी ‘मन्नत’ बंगल्याबाहेर नेहमीच त्याच्या चाहत्यांची गर्दी असते. मुंबईत गेल्यानंतर त्याचे चाहते हमखास मन्नतला भेट देत असतात.

नाशिकच्या एकाच कुटुंबातील तब्बल सहा अल्पवयीन मुलींबाबत काहीसे असेच झाले.

काही महिन्यांपूर्वी त्यांचे पालक मुलींना घेऊन ‘मन्नत’ला गेले होते; मात्र त्यावेळी त्यांना शाहरूखची झलक बघता आली नाही. ही खदखद या मुलींच्या मनात कायम होती.

अखेर मुलींनी मंगळवारी (दि.२३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरातून पळ काढला. सुरुवातीला त्या सप्तशृंग गडावर गेल्या. त्यानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास त्या नाशिकमधीलच दिंडोरी नाका परिसरात आल्या; मात्र त्या घरी गेल्या नाहीत. पुढे त्यांनी थेट नाशिकरोड गाठून शताब्दी एक्स्प्रेसने दादरपर्यंत प्रवास केला. तेथून बांद्रा येथे शाहरूख खानच्या मन्नतवर हजेरी लावली.

१२ ते १५ वयोगट असलेल्या या मुली कुठे गेल्या असतील या विचारानेच पालक पुरते हतबल झाले. त्यांनी लगेचच म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून मुली हरविल्याची तक्रार नोंदविली. एकाच वेळी सहा अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्याने पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले. पोलीस नाईक उत्तम पवार आणि महिला पोलीस शिपाई प्रिया विघे यांनी लगेचच सूत्र हलविण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी ही माहिती पोलीस आयुक्त, उपायुक्त तसेच सहायक पोलीस आयुक्तांच्या कानावर घातली.

त्यातच पालकांनी मुली मुंबईला जाऊ शकतात, अशी हिंट पोलिसांना दिल्याने तपासाची चक्रे तातडीने फिरविण्यात आली. पोलीस नाईक पवार व पोलीस शिपाई विघे यांना लगेचच मुंबईला तपासासाठी पाठविण्यात आले़ शिवाय रेल्वे पोलीस, ठाणे, कसारा, कल्याण पोलीस ठाण्यातही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मुलींचे फोटो पाठविण्यात आले. पवार व विघे या दोघांनी रात्रभर मुंबईतील विविध बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकांवर पाहणी केली़ मुलींना अभिनेता शाहरूख खानचे प्रचंड आकर्षण असल्याची माहिती मिळताच त्यांनी बांद्रा येथील मन्नत बंगल्यासमोर तपास केला असता, मुली बंगल्याबाहेर बसलेल्या असल्याचे आढळून आले.

LEAVE A REPLY

*