शासनाचे निर्देश धाब्यावर; पालिकेच्या जलकुंभाचे विज वितरण कंपनीने कनेक्शन तोडले

0

सिन्नर : पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करु नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश असतांनाही हे निर्देश धाब्यावर बसवून वीज वितरण कंपनीने नगरपालिकेच्या उद्योग भवनजवळील जलकुंभाचा विजपुरवठा मंगळवारी (दि.२३) खंडीत केला.

विशेष म्हणजे नगरपालिकेने २५ दिवस आधीच वीज बिलाचा हा भरणा केला आहे. कुठलीही पूर्वसुचना न देता परस्पर विजपुरवठा खंडीत करण्याच्या वीज वितरणच्या या कारवाईचा फटका कारण नसतांना उपनगरांना बसला असून तेथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वीज वितरणच्या या मनमानीमुळे नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांना सर्वसामान्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

उद्योग भवनजवळील ज्ञानदा पार्कजवळ नगरपालिकेचा जलकुंभ असून दारणा नदीवरील पाणी पुरवठा योजनेचे पाणी थेट ग्रॅव्हीटीने या जलकुंभाखाली जमा होते. तेथून २० अश्‍वशक्तीचा पंप लावून हे पाणी उचलून जलकुंभात भरले जाते. त्यानंतर परिसरातील सर्वच उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. येथील वीज कनेक्शनचे मार्च महिण्याचे १४१८० रुपयांचे बिल २९ एप्रिल रोजीच नगरपालिकेने भरले आहे.

एप्रिल महिण्याचे वीज बिलच अद्याप आलेले नसल्याने ते भरण्याचा प्रश्‍नही नव्हता. नाशिक-सिन्नर महामार्गाच्या कामामुळे पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फूटण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने शहराचा पाणीपुरवठा अनेक दिवसांपासून विस्कळीत हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांकडून प्रयत्न सुरु असतानाच वीज वितरणचे सहाय्यक अभियंता आर. टी. शिंदे यांनी मंगळवारी (दि.२३) त्यांना धक्का दिला. कुठलीही पूर्वसुचना न देता या जलकुंभाजवळील थ्री फेज कनेक्शनचा वीज पुरवठा सकाळी ११ च्या दरम्यान त्यांनी बंद करुन टाकला.

कर्मचार्‍यांकडून माहिती मिळाल्यानंतर नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, पाणी पुरवठा सभापती शैलेश नाईक यांनी जलकुंभावर धाव घेतली. वीज बिल भरले नसल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असल्याची माहिती मिळताच त्यांना धक्का बसला. वीज बिल भरले असतांना पुरवठा खंडीत झालाच कसा असा प्रश्‍न त्यांना पडला. त्यांनी शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. बिल भरल्याची माहिती दिली.

मात्र, त्यांच्याकडून बघतो, करतो यापलीकडे काही उत्तरच मिळेना. नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सिंग यांनी वीज बिल भरल्याची पावती वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन दाखवली. वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करण्यात येईल असे तेथील अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. मात्र, दुपारचे चार वाजल्यानंतरही विज पुरवठा सुरळीत झाला नाही. शिंदे यांनी तर नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांचे फोन उचललेच नाहीत. शेवटी पदाधिकार्‍यांनी विजवितरणचे कार्यालय गाठून पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची माहिती दिली.

तरीही शिंदे यांच्याकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत कुठलीही हालचाल झाली नाही. शेवटी पदाधिकार्‍यांनी आमदार राजाभाऊ वाजे यांना सदर घटनेची माहिती दिली. राजाभाऊंनी शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधल्यानंतर शिंदे यांनी घाई-घाईने वीजपुरवठा जोडून दिला. मात्र, तोपर्यंत सायंकाळचे ५ वाजले होते. पाणीपुरवठ्याचे ५ तास वाया गेले होते. त्याचा परिणाम उपनगरातील पाणीपुरवठ्यावर झाला आणि उपनगरातील रहिवाशांच्या रोषाचा कारण नसतांना पदाधिकार्‍यांना सामना करावा लागला. कुठलीही पूर्वसुचना न देता विजपुरवठा खंडीत करणारे शिंदे यांच्या विरोधात विज वितरणने कारवाई करावी अशी मागणी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*