शहर बससेवेच्या फेर्‍या पूर्ववत करा – आ. जयवंत जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
नाशिक । राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेर्‍यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेर्‍या पूर्ववत करण्याची मागणी आ. जयवंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आ. जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेर्‍यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

शहर बससेवा नाशिक महापालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्यावर पालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकार्‍यांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले जात आहेत. शहर बससेवेच्या आजवर दररोज 190 ड्युटी असत. त्यापैकी सध्या 70 ड्युटी बंद झाल्या आहेत. म्हणजेच एका ड्युटीच्या 8 फेर्‍यांप्रमाणे एकूण 560 बसफेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना बसथांब्यावर तासन्तास बससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या सुरू असलेल्या बसेसलाही तुफान गर्दी होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.

त्याचबरोबर एस.टी. महामंडळाने नाशिक शहरातील बसफेर्‍या कमी केल्यामुळे नादुरूस्त बसेसची संख्या वाढल्यामुळे काम नसलेल्या 50 चालक व 50 वाहकांकडून सक्तीने रजेचे अर्ज भरून घेतल्यामुळे 22 ऑगस्ट रोजी एस.टी. कर्मचार्‍यांनी अचानकपणे आंदोलन करून शहर बससेवा बंद ठेवली.

परिवहन महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी असल्यामुळे नफ्याबाबत विचार न करता प्रवाशांच्या सेवेला अग्रक्रम देऊन शहर बससेवेच्या फेर्‍या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. तसेच शहरातील प्रवासी वेठीस धरले जात असल्यामुळे शहर बससेवा सुरळीत होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सदर सेवा महापालिकेकडे वर्ग करणे किंवा फेर्‍या पूर्ववत सुरू करण्याबाबत आपण स्वतः लक्ष घालावे, असे जाधव यांनी शेवटी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*