शब्दांचे फुसके बुडबुडे!

0
‘गर्जेल तो पडेल का? बोलेल तो करेल का?’ हा वाक्‌प्रचार मराठीत प्रचलित आहे. त्याचा तंतोतंत अनुभव राजकारण्यांकडून भारतीय वर्षानुवर्षे घेत आहेत. महाराष्ट्रात पेटलेल्या शेतकरी आंदोलनानंतर त्याची प्रचिती पुन्हा आली. आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेलके जयाजी-सूर्याजी हाताशी धरून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संप गुंडाळल्याची द्वाही फिरवली.

मात्र ती अंगलट आली. मात्र सर्व सहकारी मंत्री मूकपणे मौज बघत राहिले. मित्र-शत्रूपक्ष शिवसेना तर मुख्यमंत्र्यांना खिंडीत गाठण्याची संधीच शोधत असतो. त्याने आंदोलनाला दणकून पाठिंबा दिला. सत्तेचे लाभ ओरपायला सत्ताधिशांच्या पंक्तीत बसणार्‍या शिवसेनेतही वेगळीच खदखद सुरू आहे.

कसेनापती उद्धवजी सध्या विदेशात आहेत. त्यामुळे त्यांच्या मर्दमावळ्यांना मोकळे रान मिळाले आहे. त्या संधीचा लाभ उठवून जो-तो आपापली ‘नेतागिरी’ मिरवत आहे. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ गट नेमला. त्यात दिवाकर रावते या एकमेव शिवसेना प्रतिनिधीचा समावेश आहे.

त्याचा आनंद कोणत्या शब्दात व्यक्त व्हावा? ‘मंत्रिमंडळ गटातील समावेशाची माहिती माध्यमांतून समजली’ असा ‘घरचा आहेर’ रावतेंनी मंत्रिमंडळाला का दिला असावा? ‘जुलैत राज्यात राजकीय भूकंप घडेल’ असे खा.संजय राऊत यांनी ‘शिवसेनेचे सर्वेसर्वा’ असल्याच्या थाटात नाशिक मुक्कामी ठणकावले.

पर्यावरणमंत्री रामदास कदम सध्या मौनात गेले असले तरी अधून-मधून त्यांनाही कंठ फुटतो. नको ते बोलून अडचणीत आल्यावर हेच नेते उद्धवजींचे नाव घेऊन स्वत:ची सुटका करून घेतात. शिवसेना मंत्र्यांचा हा स्वैराचार पाहता शिवसेना ‘निर्णायकी’ तरी आहे किंवा सर्व शिलेदारांत नेतृत्वाची चढाओढ तरी सुरू असावी. शिवसेनेचे काही ‘सरदार’ महाराष्ट्रात कुठे ना कुठे ‘जमीनदार’सुद्धा आहेत.

कदाचित त्यामुळे ‘राज्याच्या मंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे का?’ असा रोखठोक सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून फुरफुरलेल्या सरदाराने केला असावा का? निदान ‘सातबारा’वर तरी ‘शेतकरी’ असलेल्या मर्द सैनिकांची ती ‘जमीनदारी’ सुरक्षित राहावी म्हणून मराठी मुलखातील शेतकर्‍यांचा कळवळा सिद्ध करायला दुसरा मार्ग तरी कोणता? ‘खर्‍या शेतकरी नेत्यांशीच सरकार चर्चा करेल’,

असे बजावणार्‍या आणि गृहमंत्रीही असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शोधक व भेदक नजरेतून ही बाब लपून राहणे कसे शक्य आहे? गरजणार्‍यांपैकी कोणता शिवसेना नेता उद्धवजींच्या गैरहजेरीत किती पाऊस पाडून दाखवतो हे पाहण्यास राज्यातील जनताही उत्सूक असणारच! सत्तेची खीर ओरपण्यात सामील असलेल्यांच्या पोकळ वल्गना जनतेला बिल्कुलच समजत नसतील हा स्वार्थी भ्रम अजून किती काळ टिकू शकेल?

LEAVE A REPLY

*