विधिमंडळात घमासान

0
मुंबई । दि.2 । प्रतिनिधी-समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) राधेश्याम मोपलवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. हे प्रकरण एवढे तापले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात खडाजंगी झाली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मोपलवार यांच्या राजीनाम्याची मागणी करताना सांगितले, या अधिकार्‍याच्या संभाषणाची केवळ एक क्लिप व्हायरल होत आहे. पण या अधिकार्‍यावर 2009 मध्ये सीबीआयने आरोपपत्र ठेवले आहे.

त्याचीही चौकशी सुरू आहे. तसेच त्यांच्याविरोधात अनेकांनी वैयक्तिक स्वरुपाचे आरोप केले आहेत. या अधिकार्‍याला पदावर ठेवून चौकशी करणे चुकीचे आहे.

त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन चौकशी करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले.

तुमच्या काळात त्यांच्यावर आरोप झाले आहेत. तेव्हा तुम्ही झोपला होता का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केला.

तुमच्या काळात त्यांच्यावर आरोप असतानाही मोपलवार यांना तुम्ही महत्त्वाच्या पदावर कसे नेमले, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

मोपलवारांच्या निलंबनाचीही मागणी
काँग्रेससह राष्ट्रवादीनेही सभागृहात याबाबत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे बोलणे खोडून काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात मोपलवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले; पण त्याची सीबीआयमार्फत अजूनही चौकशी सुरू आहे. पण भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांच्यावर तीन आरोप करण्यात आले आहेत. तसेच उघडउघड ते त्या फोनच्या संभाषणात कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहाराचा उल्लेख करत आहेत. मंत्रालयात एक कोटी रुपये द्यावे लागतील, असे म्हणत आहेत. त्या मोपालवारांची त्या पदावर ठेवून चौकशी करणे योग्य होणार नाही, असे सांगत जयंत पाटलांनी मोपलवारांच्या निलंबनाची मागणी केली.

सत्ताधार्‍यांचा सभात्याग
सत्ताधार्‍यांना बोलू दिले जात नाही, असा आरोप करत बुधवारी विधान परिषदेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी सभात्याग केला. गिरीश बापट यांनी हा आरोप करत यापुढे कामकाजात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात सत्ताधार्‍यांनी सभात्याग करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि राधेश्याम मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सत्ताधार्‍यांना घेरले होते. सत्ताधार्‍यांकडे उत्तर नसल्यामुळेच त्यांनी सभागृहातून काढता पाय घेतल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

 

LEAVE A REPLY

*