वनमहोत्सवांतर्गत संगमनेर तालुक्यात

0

8 लाख 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

 

संगमनेर (प्रतिनिधी) – माणसाने भौतीक सुखांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. दुष्काळ, दूषित हवा, पाण्याची कमतरता, वाढलेले तापमान या वाढलेल्या समस्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वनमहोत्सव अंतर्गत ‘रोपे आपल्या दारी’ या उपक्रम वनराई वाढविण्यासाठी हाती घेतला आहे.

 

त्यामध्ये संगमनेर वन विभागाने तालुक्यात 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान 8 लाख 50 हजार विविध प्रकारचे रोपे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानात विविध संस्था, शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालये यांचा सहभाग लाभणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांनी दिली.

 

शासनाने आगामी तीन वर्षात राज्यात 50 कोटी वक्षरोपणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वनमहोत्सवाअंतर्गत संगमनेर तालुक्यात वृक्षरोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी प्रचार, प्रसार सुरू असून सामाजिक कार्यकर्ते प्रा. बाबा खरात यांनी पर्यावरणाची गिते गाऊन वृक्षांचे महत्त्व पटवून देत आहेत. उपविभागीय वनअधिकारी मच्छिंद्र गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन आर्मीची नोंदणी मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यालयात जाऊन जनजागृती करण्यात आली असून ग्रीन आर्मीत मोठ्या संख्येने नोंदणी झाली आहे.

 

 

तालुक्यातील संगमनेर खुर्द, निंबाळे, चंदनापुरी निसर्ग परिचय केंद्र, कौठे बुद्रुक, पिंपळगाव कोंझिरा, सामाजिक वनीकरण ओझर येथील रोपवाटिकेत रोपे तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये निम, सिसू, जांभूळ, आवळा, आंबा, वड, पिंपळ, काशिद, भेंडी, बाभूळ, बांबू, चिंच, विलायची चिंच, बोर, सीताफळ, शेवगा, हादगा, मोहा, बेहडा, हिरडा, उंबर, बिबा, खिरणी, रामफळ आदी प्रकारच्या रोपांचा समावेश आहे. या सहा रोपवाटिकेतून सुमारे 8 लाख 50 हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.

 

 

तर शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक यांना वनविभागाच्यावतीने अल्प दरात रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यासाठी संगमनेर खुर्द, निंबाळे, संगमनेर शेतकी संघासमोर अशी तीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

 

हिरवी वनराई ही सजीव सृष्टीसाठी सर्वांत मोठी देण आहे. भौतिक सुविधांसाठी मानवाने पर्यावरणाचा र्‍हास केला आहे. परंतु आता वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्यच ठरले आहे. याकरिता यावर्षी शासनाने विविध विभागांमार्फत 4 कोटी वृक्ष रोपणाचे ध्येय ठेवले असून यात नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. शालेय विद्यार्थ्यांनी एका वृक्षाचे रोपण करून त्यांचे संवर्धन करावे असे आवाहन वनविभागाने केले आहे. 1 ते 7 जुलै दरम्यान राबविण्यात येणार्‍या वृक्षरोपण अभियानाचा शुभारंभ तालुक्यातील शिरापूर येथे 1 जुलै रोजी संगमनेर पंचायत समितीच्या सभापती निशाताई कोकणे यांच्या हस्ते होणार आहे.

LEAVE A REPLY

*