लोणी व्यंकनाथमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

0

अनेक महिलांना मारहाण , एकीचा कान तोडला!

जखमी महिला
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथमध्ये रात्री एकच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांच्या टोळक्याने प्रचंड धुमाकूळ घातला. यात सहा घरांचे दरवाजे तोडून जे जागे झाले त्या महिला आणि पुरुषांना बेदाम मारहाण करत महिलांच्या कानातील दागिने तोडून काढत, गळ्यातील दागिने हिसकावून घेत एकाआड एक घराकडे मोर्चा वळवत रानमळा परिसरात धुमाकूळ घातला.पोलीस गावात येईपर्यंत या सर्व दरोडेखोरांनी पोबारा केला होता.
सकाळी श्‍वान पथकाने सकाळी पारगाव सुद्रिक श्रीगोंदा रस्त्यापर्यंत माग काढला. उशिरा पर्यंत पोलीस तपास करत होते. याबाबत गणेश शंकर शिंदे वय 28 यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून थांबलेले चोरी आणि दरोड्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे दिसले. गावातील रानमळा परिसरात या दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला.
जे महिला, पुरुष प्रतिकारासाठी पुढे आले त्यांना बेदाम मारहाण करण्यात आली. यात संजय दादा काकडे यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात पहिल्यांदा प्रवेश केला मात्र घरातील मंडळी जागी झाल्याने या ठिकाणावरून या दरोडेखोरांनी आपला मोर्चा मोहन काकडे यांच्या घराच्या बाजूला असलेले सुरेश मडके यांच्या घराकडे वळविला. तेथे घरात प्रवेश करून महिलांच्या गळ्यातील दागिने काढून घेत कानातले दागिने तोडून घेतले. याठिकाणी मडके पती पत्नीला बेदाम मारहाण करण्यात आली. त्यांचा मुलाच्या अंगावर वार करण्यात आले.
यानंतर बबन जाधव यांचे घर फोडून याठिकांणच्या महिलांच्या अंगावरील दागिने धमकावून काढून घेतले. यात या ठिकाणी झोपलेल्या महिलेचा कान तोडल्याने त्या जखमी झाल्या आहेत . त्यांच्या डोक्यात वार करण्यात आले. यानंतर गावकरी जागे झाले होते. तसेच पोलिसही गावात आले असल्याने या दरोडेखोरांनी पळ काढला. याठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर त्यांच्या पथकासह हजर झाले होते. तसेच सकाळी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. या श्वानाने पारगाव सुद्रिक, श्रीगोंदा या रस्ताच्या पर्यंत माग काढला उशिरा पर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक गाववाच्या परिसरात आणि आसपास तपास करत होते . घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी भेट दिली.
यात गणेश शिंदे यांच्या घरात प्रवेश केला. यात या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत त्यांची आई पार्वतीबाई यांच्या डोक्यात कोयता मारला असल्याने त्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर गणेश यांच्या मांडीवर वार करण्यात आले आहेत. त्यांच्या घरातील आणि महिलांच्या अंगावरील सोन्याची दागिने आणि रोख रक्कम मिळून 25 हजार रुपये पळवले आहेत.

LEAVE A REPLY

*