लाच घेताना मंडलाधिकारी चतुर्भुज

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – नाशिकच्या अप्पर आयुक्तांनी दिलेल्या निकालाप्रमाणे तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमिनीची नोंद महसुली रेकॉर्डला घेऊन सुधारित सातबारा उतारा देण्यासाठी सात हजार रुपयाची लाच घेताना नागापूरचे मंडलाधिकारी दादासाहेब सखाराम बर्डे (वय-53 वर्षे, रा. नागापूर, अहमदनगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
नागापूर मंडल हद्दीतील तक्रारदाराने 93 आर शेतजमीन खरेदी केली होती. या शेतजमिनीची नोंद करण्यासाठी तक्रारदाराने नाशिक विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील केले होते. यावर तक्रारदाराची महसूली रेकॉर्डला नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे महसुली रेकॉर्डला नोंद करुन सुधारीत सातबारा उतारा देण्यासाठी मंडलाधिकारी दादासाहेब सखाराम बर्डे यांच्याकडे कागदपत्राची पूर्तता केली होती.
मात्र 93 आर शेतजमिनीची महसुली रेकॉर्डला नोंद करून सुधारीत सातबारा उतारा देण्यासाठी मंडलाधिकारी दादासाहेब बर्डे यांनी तक्रारदाराकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही लाचेची रक्कम तक्रारदाराकडून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बर्डे यांना नागापूर मंडलाधिकारी कार्यालयात पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.
ही कारवाई नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत पथकाचे पोलीस उपअधीक्षक विष्णू ताम्हणे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, सहायक फौजदार काशिनाथ खराडे, पो. हे. कॉ. अंबादास हुलगे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

*