‘लाचलुचपत’च्या कारवाईत लक्षणीय घट

0

चार महिन्यांत अवघी सात प्रकरणे; आठ जणांना पकडले

अहमदनगर (प्रतिनिधी) –  प्रशासकीय खात्यातील भ्रष्टाचार संपवून नागरिकांच्या मदतीला धावण्याची महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2017 मध्ये केवळ सात कारवाया केल्या आहेत.  या विभागाकडे नागरिकांच्या तक्रारी येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. पांगरमल घटनेतील आरोपींच्या संपर्कात असलेल्या या शाखेची समाजात पत घटल्याची चर्चा खुलेआम सुरू आहे.

नगरची लाचलुचपत प्रतिबंधक शाखा नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कधी बनावट सापळे, कधी अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रारी, तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांचा आरोपींशी असलेला संपर्क, ब्लॅकलिस्टमधील आरोपींना ‘लाचलुचपत’चे अभय, जाळ्यात अडकविण्याच्या धमक्या असे अनेक प्रकार लेखी स्वरूपात उपलब्ध आहेत. पांगरमल घटनेतील काही आरोपी ‘लाचलुचपत’च्या काहींच्या संपर्कात राहून पोलीस व महसूल शाखेसह अन्य शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना ब्लॅकमेल करीत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तेथील अधिकार्‍याची बदली करण्यात आली. मात्र त्याचा परिणाम जनतेच्या विश्‍वासार्हतेवर झाला आहे.
2015 मध्ये ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 38 प्रकरणात 48 लाचखोर अडकलेे. 2016 मध्ये वर्षभरात 35 प्रकारणांत 41 लाचखोरांना बेड्या ठोकल्या. ही अकडेवारी समाधानकारक असली तरी 2017 मध्ये केवळ सात कारवाया करून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. म्हणजे अन्य वर्षाच्या तुलनेत ही अकडेवारी कारवाईचा आलेख कमी होत चालल्याचे स्पष्ट करते.

गेल्या सहा महिन्यात आरोग्य, कृषी खाते प्रत्येकी 1, महसुल 2, पोलीस 3, आशा केवळ 7 कारवाया झाल्या आहेत. या अकडेवारीचा विचार करता जनतेचा विश्‍वास उडत चालल्याचे दिसत आहे. हा विचार करता ‘लाचलुचपत’ शाखेच्या महानिरीक्षकांनी काही अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी सुरू केली आहे. अधिकार्‍याची बाजूच्या शाखेत बदली केली आहे. त्यांच्या जागी पोलीस उपअधिक्षक विष्णू ताम्हाणे यांनी पदभार घेतला आहे. त्यांना जनतेचा विश्‍वास संपादन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

  ‘लाचलुचपत’ शाखेत ब्लॅक लिस्टवर असणारे आरोपीच ‘लाचलुचपत’च्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संपर्कात होते. त्यामुळे संगनमताने मोठा मेवा जमविण्याचे काम त्यांच्याकडून केले जात होते. जर एखादा अधिकारी अर्थपूर्ण तडजोड मान्य केला नाही तर त्याच्यावर खोटा सापळा लावून गुन्हा दाखल करणे, त्याचे निलंबन करणे, अशा प्रकारे अधिकार्‍यांवर कारवाई केल्याच्या नोंदी कोतवाली पोलीस ठाण्याच्या नोंद रजिस्टरमध्ये दाखल आहेत. दरम्यानच्या कालावधीत कारवाई झालेल्या बहुतांशी केसेस निर्दोष झाल्या आहेत. लाचलुचपतच्या या बनावट छाप्यामुळे चांगल्या अधिकार्‍यांची बदनामी होत आहे. त्यामुळे याप्रकरणी एका अधिकार्‍यानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारामुळे या शाखेचे नाव बदनाम होत आहे.

एसपींची भूमिका स्पष्ट, कलेक्टरांचे काय?
कोणत्याही पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना पकडला गेला तर त्याच्या भ्रष्टाचारास जबाबदार धरून संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याची नियंंत्रण कक्षेत बदली करण्यात येईल, अशी भूमिका पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घेतली आहे. त्यांच्यासारखीच भूमिका जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी घेतली तर जिल्ह्यातील भ्रष्टाचार संपण्यास मदत होईल. पोलीस अधीक्षकांच्या घोषणाची अंमलबजावणी झाली तर पोलिसांची प्रतिमा पारदर्शी होण्यास मदत होणार आहे. पोलीस खात्यानंतर महसूल शाखेत मोठा भ्रष्टाचार चालतो, हे आकडेवारीवरून सिद्ध होेते. तो कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.

कारभार पारदर्शी करणार
जनतेने ‘लाचलुचपत’ शाखेवर विश्‍वास ठेवून जी तक्रार केली आहे. तिचे पूर्णपणे निरसन केले जाईल. कोणावरही बनावट कारवाई केली जाणार नाही. सामन्य नागरिकांची सरकारी कार्यालयात फसवणूक होत असेल तर त्यांनी ‘लाचलुचपत’ शाखेशी संपर्क साधावा. गोपनीय कामकाजात कोणाचे नाव जनतेसमोर येणार नाही. या मागील घटनांसाठी मी अनभिज्ञ आहे. मात्र आजपासून या शाखेचा कारभार सरळ व पारदर्शी करणार आहे. त्यामुळे जनतेने विश्‍वासाने तक्रारी कराव्यात.
– विष्णू ताम्हाणे
(पोलीस उपअधीक्षक, ‘लाचलुचपत’)

LEAVE A REPLY

*