राहुरी विद्यापीठात विद्यार्थ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

राहुरी (प्रतिनिधी)- येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने मारूती दुधगोंडे या बीटेकच्या विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या जाचास कंटाळून प्रशासकीय इमारतीसमोरील वसतीगृहाजवळ सुरक्षा रक्षकाच्या समक्ष अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, आडमुठ्या विद्यापीठ प्रशासनाने त्याची व्यथा ऐकून न घेताच त्याच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, दुधगोंडे यास राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल शुक्रवारी (दि. 12) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

 
दुधगोंडे या विद्यार्थ्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालयात सन 2007-08 मध्ये प्रवेश घेतला होता. एका विषयात सतत अनुत्तीर्ण होऊन त्याला सन 2012 मध्ये यश मिळाले. सन 2012-13 मध्ये त्याने नियमित परीक्षा दिली. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्याचा निकाल वेळेत दिला नाही. पुढील सत्राचेही निकाल त्याला तोंडीच देण्यात आल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान झाले. सन 2015 मध्ये अंतिम वर्षाचा पूर्णत्व टप्प्यात असताना त्याला विद्यापीठ प्रशासनाने चक्क खोटे निकालपत्र देऊन त्याच्या सर्वच निकालात फेरफार केला असल्याचा आरोप दुधगोंडे याने तक्रारीत केला आहे.

 
दि. 12 ऑक्टोबर 2017 रोजी महाविद्यालयीन पातळीवर या विद्यार्थ्याला कोणतीही स्वाक्षरी नसलेले निकालपत्र देण्यात आले. नंतर त्याने मागणी केल्यावर स्वाक्षरीचे निकालपत्र देण्यात आले. पहिल्या व नंतरच्या निकालपत्रात तफावत असल्याचा आरोप दुधगोंडे याने केला आहे. 3, 4, 5 व 6 व्या सत्रातील निकालपत्रातही खूप गोंधळ असल्याचा आरोप त्याने केला आहे. विद्यापीठ विद्या विभाग व कुलसचिव यांना भेटूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याचे दुधगोंडे यांनी सांगीतले. महाविद्यालय प्रशासनाने तीन वर्ष विद्यार्थ्याची दिशाभूल केल्यानंतर या प्रकरणाची कोठे वाच्यता होऊ नये, यासाठी त्याला झुलवत ठेवले. अंतिमक्षणी विद्यार्थ्याला नियमबाह्य दाखवून हे प्रकरण विद्यापीठ प्रशासनाने दडपण्याचा प्रयत्न केल्याचे दुधगोंडे याने सांगीतले.

 

शेवटी निराश झालेल्या दुधगोंडे याने विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याच्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे विद्यापीठाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

 
दरम्यान, विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. प्रकाश तुरबतमठ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात मारूती सोपान दुधगोंडे (वय 27, रा. फुलकळस, ता. पुर्णा, जि. परभणी) या विद्यार्थ्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

*