राहुरी तालुक्यात उसाची लागवड तिपटीने वाढणार?

0

कृषीखात्याचा अंदाज यंदा 26950 हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट कृषी सहाय्यकांची नियोजन बैठक
कांदा, तूर, सोयाबीन लागवडीला शेतकर्‍यांची नापसंती 10 हजार हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट

 

राहुरी (प्रतिनिधी)- हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा समाधानकारक अंदाज, मुळा धरणाची पाण्याने भरलेली ओटी, त्यामुळे शाश्‍वत सिंचन उपलब्ध होण्याच्या हवाल्यावर यंदा राहुरी तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत उसाचे क्षेत्र तिपटीने वाढण्याची शक्यता कृषीखात्याने वर्तविली आहे. त्यातच आता डॉ. तनपुरे कारखान्याचे धुराडे पेटण्याची सोळा आणे खात्री पटल्याने अवंदा बळिराजा पुन्हा उसाचे मळे फुलविण्याचे स्वप्न बघत असल्याचे संकेत मिळत आहेत. मागील वर्षी केवळ 3 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली होती. यंदा मात्र, तब्बल 9 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 
दरम्यान, वरुणराजाच्या मेहेरबानीमुळे मागील वर्षातील खरीप व रब्बी हंगाम कमालीचा यशस्वी झाल्यानंतर यंदाही खरीप हंगाम यशस्वीतेसाठी कृषी विभागाने नियोजन हाती घेतले आहे. सन 2017 च्या खरीप पिकासाठी एकूण 26 हजार 950 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राहुरी तालुक्यात आता मान्सूनपूर्व मशागती सुरू झाल्या असून पावसाच्या आगमनानंतरच पेरण्या सुरू होणार आहेत. त्यामुळे सध्या शेतकर्‍यांची मशागतीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे.

 
रब्बी हंगाम संपल्यानंतर राहुरीच्या कृषी विभागाने मान्सूनपूर्व खरिपासाठी कंबर कसली आहे. कृषी विभागाने खरिपासाठी कृषी सहायकांची नियोजन बैठक घेतली. कृषी सहायकांनी बैठकीत दिलेल्या अहवालानुसार खरीप नियोजन आखण्यात आले. यात बाजरी 1500 हेक्टर, मका 2100 हेक्टर, तूर 1050 हेक्टर, मूग 400 हेक्टर, भुईमूग 800 हेक्टर, सोयाबीन 6100 हेक्टर, कापूस 6000 हेक्टर असे एकूण 26 हजार 950 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी गृहीत धरण्यात आली आहे.

 
सन 2016 मधील खरीप हंगामात, मागील वर्षी 145 टक्के खरिपाची पेरणी झाली होती. त्यावेळी बाजरी 12 हजार 300 हेक्टर, सोयाबीन 7500 हेक्टर, कापूस 7500 हेक्टर, मका 3600 हेक्टर, तूर 2780 हेक्टर इतकी पेरणी झाली होती. उसाची 3 हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मागील वर्षी मुळा धरण दोनदा पूर्ण क्षमतेने भरल्याने शाश्‍वत सिंचन साधल्यामुळे 145 टक्के क्षेत्रावर पेरणी होऊन कृषी विभागाने ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा आकडेवारीत जादा भर पडली होती.

 
यंदा खरीप क्षेत्रावर मागील वर्षाच्या शासकीय धोरणांचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कांदा, तूर, सोयाबीन पिकांना कवडीमोल भाव मिळाला. त्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या अद्यापही सावरलेला नाही. त्यामुळे यंदा ही पिके घेण्याचे धाडस शेतकरी करणार नसल्याचे संकेत आहेत.

 

 

 कृषी विभागाकडून मनरेगा अंतर्गत फळबागांची लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे. एकूण 10 हजार हेक्टर क्षेत्रावर रोजगार हमी योजनेच्या मजुरांकडून फळबागांची लागवड करण्याचा लक्षांश हाती घेण्यात आला आहे. यासाठी कृषी विभागातील प्रत्येक कृषीसेवकास 480 हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य देण्यात आल्याची माहिती संपत कडू यांंनी दिली.

LEAVE A REPLY

*