राजकीय लुडबूड खपवून घेणार नाही

0

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांचा इशारा ; गुन्हेगारांची डाटा बँक तयार करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – नावाप्रमाणेच अहमदनगर हा मोठा व संवेदनशील जिल्हा आहे. गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न केले जातील. अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. गुन्हेगारी रोखण्यासाठी दत्तक योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती नूतन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

 

गुन्हेगारी थांबवा किंवा गुन्हा उघडकीस आणा असा सूचक इशारा शर्मा यांनी पोलीस अधिकार्‍यांना पत्रकारांशी वार्तालाप करताना दिला. पोलीस दलात राजकीय लुडबूड खपवून घेणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारांची डाटा बँक तयार करण्यात येत असून त्यातून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.
शर्मा यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. बेसिक पोलिसिंगवर आपला भर असणार आहे. पोलीस दलातील कर्मचारी हा समाधानी असला पाहिजे यादृष्टीने प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणली जाईल.प्रत्येक पोलीस ठाण्यातील गुन्हेगारांची माहिती असणारा डाटा संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. आठवडाभरात गुन्हेगारांचा डाटा गुन्हे शाखेकडे जमा होईल.
अहमदनगर जिल्ह्याला सात जिल्ह्यांची हद्द लगत असून तेथील गुन्हेगारांचा डाटाही मागविला आहे. हा डाटा एकत्र झाल्यानंतर त्यातील गुन्हेगारी वृत्तीचे गुन्हेगार शोधून काढले जातील. प्रत्येक पोलिसाला काही गुन्हेगार दत्तक दिले जातील.

 

त्या पोलिसाने दत्तक दिलेल्या गुन्हेगारावर वॉच ठेवण्याचे काम करायचे आहे. त्यातून गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईलने पळविण्याच्या घटनांना आळा घालण्यात येईल. त्यासाठी चेनस्नॅचिंग करणार्‍यांची एका पोलीस ठाण्यातील माहिती दुसर्‍या पोलीस ठाण्यास कळविली जाणार आहे.
एकच गुन्हेगार विविध ठिकाणी असे गुन्हे करीत असतात. त्याला या पध्दतीने आळा घालता येणे शक्य असल्याचे शर्मा यांनी सांगितले. वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी महाजन यांच्याशी चर्चा करून पोलीस-महसूल एकत्रितपणे कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिस्तीवर भिस्त
पोलीस दलातील बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही. कोणी बेशिस्त वर्तन केले, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणत्याही अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. संबंधित पोलीस कारवाई करत नसेल तर थेट आपल्याशी (मोबाईल नंबर-8888310000) संपर्क साधावा असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.

 

 गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हेगारांचीच मदत पोलीस घेतात. मात्र ही मदत फक्त कामापुरतीच असावी. त्यापलीकडे ती जाऊ नये. सज्जन माणसांना गुन्हेगारांची माहिती नसते. त्यामुळे गुन्हेगारच गुन्हेगाराची माहिती देऊ शकतो. ही माहिती घेणे वावगे नाही. मात्र माहितीपुरतीच पोलिसांनी गुन्हेगारांशी संबंध ठेवावे. त्याच्या अवैध धंद्याला पाठबळ देऊ नये. पोलिसांनी चांगले काम केले तर त्याला रिवार्ड दिले जाते. उदार मनाने हे रिवार्ड देतो, वाईट काम केले तर मात्र वाईटापेक्षाही वाईट अशी शिक्षा केली जाईल असे सांगत शर्मा यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. 

 

पोलीस ठाण्यात अभ्यागत कक्ष
तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला नेमके कोणाला भेटावे हे कळत नाही. तेथे त्याला चांगली वागणूकही मिळत नाही. प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अभ्यागत कक्ष निर्माण केला जाईल. तेथे तक्रारदाराला मार्गदर्शन केले जाईल. प्रत्येक अर्ज निकाली काढण्याची सूचना ठाणेदाराला केली जाईल. ठाणेदाराने तक्रार/अर्ज निकाली काढला नाही तर त्याची गय केली जाणार नाही. वरिष्ठांकडे अर्ज केला म्हणून कोणी पोलीस तक्रारदाराची दखल घेत नसेल तर ते सहन करणार नाही, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*