मोदींच्या गुजरातमध्ये भाजपला धक्का; काँग्रेसचे अहमद पटेल विजयी

0

गुजरात राज्यसभा निवडणूक: काँग्रेसच्या दोन आमदारांची मतं रद्द

गांधीनगर : गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिष्ठेच्या लढाईत काँग्रेसने भाजपवर मात केली आहे. काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांचा अवघ्या अर्ध्या मताने पराभव केला असून त्यांना 44 मते मिळाली. काँग्रेसचा हा विजय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गुजरातमधील तीन जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये घमासान पाहायला मिळाले. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या चाणक्यांमधील लढाईत अखेर काँग्रेसने बाजी मारली आहे.

काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला विजय मिळवण्यात यश आल्याने पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावणार आहे.

मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडल्यानंतर 5 वाजता मतमोजणी सुरु झाली. मात्र, दोन काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग करत आपली मतपत्रिका तिथे उपस्थित असलेल्या अमित शाह यांना दाखवली. त्यानंतर काँग्रेसने यावर आक्षेप घेत मतमोजणी थांबवली आणि याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. दोन्ही बाजू ऐकून आणि तेथील सीसीटीव्ही फूटेज पाहून निवडणूक आयोगाने दोन आमदारांची मत तब्बल पाच तासानंतर रद्द ठरवली.

त्यानंतर सव्वाबारा वाजता मतमोजणी सुरु झाली. पण त्यानंतर भाजप पुन्हा एकदा मतमोजणी थांबवली. अखेर रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी पुन्हा मतमोजणी सुरु झाली. त्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात निकाल समोर आला.

ज्यामध्ये अहमद पटेल हे अवघ्या अर्ध्या मतानं विजयी झाल्याचे समोर आले. त्याचवेळी अहमद पटेल यांनी ट्वीटरवरुन याबाबत माहिती दिली. दरम्यान, या निवडणुकीत अमित शाह आणि स्मृती इराणी यांना प्रत्येकी 46-46 मते मिळाली असून तेही विजयी झाले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेल्या अहमद पटेल यांचा पराभव करून गुजरात काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीआधी खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसने शेवटपर्यंत किल्ला लढवत भाजपला जोरदार धक्का दिला.

सरकारी यंत्रणेचा, बळाचा आणि पैशांचा दुरुपयोग करणार्‍यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराचा मी आभारी आहे, भाजपकडून येणारा दबाव आणि प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही मला मत दिले. गुजरातमधील काँग्रेस आमदारांचे पुन्हा एकदा आभार मानले. सूडाचे राजकारण करणार्‍या भाजपचे पितळ उघडे पडले. राजकीय दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील जनताच त्यांना धडा शिकवेल. सत्यमेव जयते! हा फक्त माझा एकट्याचा विजय नाही. हा काँग्रेस पक्षाचा विजय आहे. मी आतापर्यंत पाच लोकसभा निवडणुका आणि चार राज्यसभा निवडणुका लढवल्या. पण आतापर्यंतची एवढी टफ निवडणूक मी पाहिली नाही.- अहमद पटेल

LEAVE A REPLY

*