मृगाची जोरदार बॅटिंग, सरासरीच्या 20 टक्के पाऊस

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसाने जोरदार बॅटिंग करत दमदार आगमन केले. मृगाच्या पावसामुळे खरिप हंगामच्या पेरण्यांना सुरूवात होणार आहे. रविवारीअखेर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 20 टक्के पाऊस झाला आहे. धरण परिसारात अद्याप मान्सून सक्रिय झाला नसल्याने धरणात अद्याप नव्या पाण्याची आवक झालेली नाही.

रविवारी नगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पाऊस झाला. सलग पाच दिवसांपासून शहरात मृगाच्या सरी बरसत आहेत. दिवभर उकाडा, दुपारनंतर आभाळ भरून येत असून सायंकाळी संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नगरकर सुखावले असले तरी शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने नगकर वैतागले आहेत. ग्रामीण भागात काही भागात अतिवृष्टी झाली असून छोटी-मोठे बंधारे पाण्याने तुंडूब भरलेले आहेत.
या पावसामुळे बाजारपेठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी संप मिटल्याने खते, बियाणे आणि किटक नाशके विक्रेत्यांसोबत सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला आहे. लवकर पेरण्याला सुरूवात होणार असल्याची चिन्हे असून वरूणराजाने अशीच कृपादृष्टी ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात रविवारी अकोले तालुक्यात 4, संगमनेर 6, कोपरगाव 6, पाथर्डी 3, श्रीगोंदा 15, राहुरी 30, नगर 19, पारनेर 15, जामखेड 17, राहाता 16, शेवगाव 55 आणि कर्जत 17 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्याला मात्र पावसाने हुलकावणी दिलेली आहे.
धरण क्षेत्रात अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षा असून त्या ठिकाणी मान्सून सक्रिय झाल्यानंतर धरणात नव्याने पाण्याची आवक होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 17

LEAVE A REPLY

*