‘मुद्रा’ योजनेने आली स्वयंरोजगाराला उभारी…

0

भारत हा तरूणांची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे. आपल्या देशात तरूणांच्या संख्येबरोबरच सुशिक्षीत बेरोजगार युवकांची संख्याही तेवढीच जास्त आहे.

त्यामुळे प्रत्येकाला शासकीय, खाजगी अथवा निमशासकीय नोकरी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे तरूणांनी स्वयंरोजगार विकसित करावा. त्यासाठी मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेमुळे निश्चितच रोजगार सृजन निश्चितच मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुद्रा योजेनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय तरूणांनी उभारल्यास ते निश्चितच स्वयंव्यावसायिक बनतील.

मुद्रा योजनेंतर्गत शिशू, किशोर व तरूण या तीन श्रेणीमध्ये कर्ज वितरण करण्यात येते. शिशू श्रेणीमध्ये 50 हजार रूपयांपर्यंत, किशोर श्रेणीत 5 लक्ष रूपयांपर्यंत आणि तरूण श्रेणीमध्ये 10 लक्ष रूपयांपर्यंत कर्ज वितरण केले जाणार आहे. कर्ज घेतलेल्या कर्जदारांना मुद्रा कार्ड दिले जाणार आहे.

हे कार्ड आधार क्रमांकाशी लिंक असेल. या कार्डाची वैशिष्ट्ये म्हणजे हे लवचिक व कटकट नसणारे आहे. युनीटच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करणारे हे कार्ड रूपे डेबिट कार्डच्या स्वरूपात जारी करण्यात आलेले आहे. तसेच सर्व बँक शाखांमध्ये हे कार्ड उपलब्ध आहे. मुद्रा अंतर्गत 5 लक्ष रूपयांपर्यंतच्या कर्जाला कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही. या तीन कर्जावर आकर्षक व्याज दर आकारण्यात येतो.

या योजनेत मुख्यत: कृषि क्षेत्राच्या व्यतिरिक्त व्यवसाय उद्योग करण्यासाठी देण्यात येत होते. परंतू नुकतेच कृषि क्षेत्राला पुरक असणाऱ्या व्यवसायासाठीही या अंतर्गत कर्ज मिळते. छोटे व्यवसाय जसे भाजीपाला विक्री करणारे, स्टेशनरी दुकान, झेरॉक्स मशीन टाकणे, खाणावळ, स्वत:चे ब्युटी पार्लर, खाद्य पदार्थ विक्री करणारी गाडी टाकणे, पोल्ट्री फार्म, सेवा देणारा उद्योग अशा प्रकारचा कुठलाही लघु उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

मुद्रा योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये शिशू प्रकारात 128.24 लक्ष रूपयांचे वितरण 68 हजार 764 खातेदारांना प्रकरणधारकांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किशोर गटामध्ये 2759 प्रकरणधारकांना 42.52 लक्ष रूपये आणि तरूण गटामध्ये 295 केसेसमध्ये 23.6 लक्ष रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

सदर कर्ज विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. या कर्जामुळे आपल्या कौशल्यानुसार अनेक बेरोजगार तरूणांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. मुद्रा योजनेमुळे नागरी असो वा ग्रामीण भागातील बेरोजगार तरूण स्वत:च्या पायावर उभा राहत आहे. बँकांनी मुद्रा योजनेच्या प्रकरणांमध्ये त्वरित कर्ज मंजूर करून तरूणांना उद्योजक अथवा व्यावसायिक होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.

मुद्रा योजनेतंर्गत अर्थसहाय्य घेण्यासाठी तरूणांनी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत संपर्क करावा. त्याठिकाणी अर्ज दाखल करून आपल्या व्यवसायानुरूप कागदपत्रे सादर करावी.

अगदी सहज पद्धतीने मुद्रा योजनेचे कर्ज उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यात अनेक बेराजेगार तरूणांनी स्वत:चा व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे बेरोजगारीवर मात करणे शक्य झाले असून नोकरीवरचे अवलंबित्व कमी झाले आहे.

मुद्रा आलीया दारी… स्वयंरोजगाराला मिळाली उभारी या वाक्याप्रमाणे बेरोजगार युवकांच्या आयुष्यात मुद्रा योजनेमुळे नवी पहाट उगविली आहे. यात शंकाच नाही.

जिमाका (बुलढाणा)

LEAVE A REPLY

*