मुठेवाडगावच्या दारूचे धागेदोरे गोव्यापर्यंत

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – मुठेवाडगाव येथे एका शेतकर्‍याच्या पत्र्याच्या शेडमधून सापडलेल्या सुमारे अडीच लाख रूपये किंमतीच्या विदेशी दारूच्या साठ्याचा तपास थेट गोवा राज्यापर्यंत पोहचला आहे.

 
या दारूसाठ्याचा मालक आठवडाभरानंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान पोलिसांनी या दारूचे नमुने तपासणीसाठी नाशिकच्या प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. मुठेवाडगाव शिवारात गट नं. 126 मध्ये एका पत्र्याच्या शेडमधून 245 विदेशी दारूचे खोके पोलिसांनी 7 मे रोजी जप्त केले होते. यामध्ये 8 ते 10 आरोपींचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दत्तात्रय चौधरी यांच्या राहत्या घराच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये हा दारूसाठा सापडला तेव्हा त्यांच्या घरी कोणीही नव्हते.

 

काही वेळाने त्यांच्या पत्नी पुष्पा तेथे आल्या असता त्यांनी त्यात काय आहे व कोणाचे आहे हे माहित नसल्याचे सांगितले. पोलिसांनी दारूसाठा जप्त केला घटनेला एक आठवडा होवूनही आरोपी न सापडल्याने त्यांचे धागेदोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. नाशिक येथील प्रयोगशाळेत लॅबमध्ये दारू तपासणी करण्यासाठी नमुना पाठविला आहे. गोव्याच्या उत्पादन शुल्क अधिकारी व रिअल व्हिस्की कंपनीशी संपर्क साधण्यात येत आहे. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास जलदगतीने होईल.

 

आरोपींची नावे उघड झाल्यानंतर त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येईल. असे श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक किशोर परदेशी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*