मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी टक्के मागण्या मान्य केल्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांचा संप मागेः जाधव  

0

किसान क्रांतीच्या शिष्टमंडळाची मुंबईत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

 

 

पुणतांबा (प्रतिनिधी)- शेतकर्‍यांच्या विविध मागण्याबाबद किसान क्रांतीने 1 जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर गेले होते. राज्य शासनाने संपाच्या दुसर्‍या दिवशी किसान क्रांतीच्या कोअर कमिटीला चर्चसाठी मुंबई येथे बोलावले होते. त्यानुसार किसान क्रांतीचे कोअर कमिटीचे सदस्य जयाजी सूर्यवंशी, धनंजय जाधव, डॉ. अजित नवले, कमलताई सावंत, संदिप गिडे, किरण सुराळकर आदींसह अनेक सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर रात्री 12.30 वाजता भेट घेतली.

 

 
या बैठकीत कृषीमंत्री सदाभाऊ खोत, ना. चंद्रकांत पाटील, आ.सौ. स्नेहलता कोल्हे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुमारे चार तास झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या ऐंशी टक्के मागण्या मान्य केल्यामुळे किसान क्रांतीने आपला संप मागे घेतल्याची माहिती किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजी सूर्यवंशी व धनंजय जाधव यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 

 

यावेळी मुख्यमंत्री ना. फडणवीस, ना. खोत, आ.सौ. कोल्हे ही उपस्थित होते. बैठकीत शेतकर्‍यांच्या मागण्यावर चर्चा होऊन सरसकट कर्जमाफी ऐवजी थकित अल्पभूधारक शेतकर्‍यांना 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी देण्याची कार्यवाही करण्याबाबद एकमत झाले. याबाबद एक समिती गठित करून त्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात येणार आहे. समितीत शेतकर्‍यांचे प्रतिनिधीही असणार आहेत. हमी भावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणे हा फौजदारी गुन्हा ठरणार असून या बाबदचा कायदा संमत करण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार आहे. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

 

 

दूधाला वीस जूनपर्यंत भाव वाढून देण्यात येणार आहे, हमीभाव निश्‍चित करण्यासाठी राज्य कृषीमूल्य आयोगाचे गठन करण्यात येणार आहे. थकित वीज बिलाचे व्याज व दंड व्याजमाफ करण्यात येऊन बिलाची रक्कम टप्प्याने वसुल करण्यात येणार आहे. शीतगृह साखळी निर्माण करणे, नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग सुरु करणे, शेतकर्‍यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे, आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या अशोक मोरे यांच्या कुटूबियांना आर्थिक मदत देणे आदी महत्वाच्या मागण्या मान्य झाल्यामूळे संप मागे घेतल्याचे श्री. सूर्यवंशी व जाधव यांनी स्पष्ट केले. दरम्यान बैठकीच्यावेळी संप मागे घेण्याचा निर्णय न आवडल्यामूळे डॉ. अजित नवले हे बैठकीतून बाहेर पडले होते.

 

 

दरम्यान संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे वृत बाहेर येताच राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तसेच पुणतांबा नाशिकसह अनेक जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी संप चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संप मागे घेण्याबाबद शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच किसान क्रांतीचे समन्वयक जयाजी सूर्यवंशी यांनी संपाबाबद उलटसुलट विधाने केल्यामुळे संभ्रमात भर पडली आहे. शेतकरी वर्गाकडून अचानक संप मागे घेतल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

*