मालेगाव होरपळले!

तापमान ४४.६ अंशावर

0
नाशिक | दि. २० प्रतिनिधी – दिवसेंदिवस ऊन वाढतच असल्याने वातावरणात प्रचंड उष्णता वाढली आहे. नाशिकमध्ये तापमान ४०.१ अंशावर पोहोचल्याने नागरिकांची काहिली होत आहे, तर मालेगावमध्ये उन्हाचा पारा ४४.६ अंशावर गेल्याने जिल्ह्यात मालेगाव सर्वाधिक होरपळून निघाले आहे.

उन्हाळा शिगेला पोहोचत असल्याचे चित्र एप्रिल महिन्याच्या मध्यातच दिसू लागले आहे. अजून संपूर्ण मे महिना आणि त्यानंतरही उन्हाचे प्रमाण टिकून राहण्याच्या शक्यतेने नागरिकांना चिंताग्रस्त केले आहे.

अनेकांना दुपारी १२ नंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत बाहेर जाणे नकोच, असे वाटत असल्याने वाढलेल्या तापमानाने नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. त्यात मालेगावचे तापमान सर्वाधिक झाल्याने वाढलेल्या उन्हाचा धसका नागरिकांनी घेतला आहे.

वातावरणात आर्द्रतेचा लवलेश नाही. त्यामुळे अंगातून निघणार्‍या घामाच्या धारा जागीच विरून जात आहेत. अंगाला चटका बसण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

त्यामुळे उकाडा परवडला पण उन्हाचा चटका नको, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. कारण उघड्या अंगावर उन्हाची प्रखरता थेट पडली तर अंग भाजल्यासारखा अनुभव येत असल्याची नागरिकांची ओरड वाढलेल्या तापमान कालावधीत आहे.

उघड्यावर असलेले जलसाठे अतितापमानाने बाष्पीभवनाचा वेग वाढणारे ठरले आहे. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात पाणी हवेत बाष्पीभवनाद्वारे विरून जात असल्याचे चित्रही जिल्ह्यात आहे.

गेल्यावर्षी याच कालावधीत उन्हाचा पारा नाशिकमध्ये ३६ ते ३८ अंशाच्या दरम्यान होता. तर मालेगावमध्ये सुमारे ४० अंशाच्या आसपास पोहोचलेला होता. मात्र यंदा यात सुमारे २ ते ४ अंशाची वाढ झाली आहे. अजून तर मे महिन्याचा प्रखर उन्हाळा बाकी आहे. तेव्हा उन्हाची झळ किती असेल याची धास्ती नागरिकांना लागून आहे.

लक्षणीय वाढ
जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असली तरी हवामान विभागाने तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढल्याचे स्पष्ट करून असेच वातावरण अजून एक-दोन दिवस असेल, असे सूचीत केले आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे.

LEAVE A REPLY

*