महापालिकेचे कागदी घोडे

0

मोडकळीस आलेल्या इमारती
नोटीस पाठवून झटकले हात

अहमदनगर (प्रतिनिधी)– नगर शहरातील मध्यवस्तीतील अनेक ठिकाणी जुन्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. पावसात त्या कधी कोसळतील याचा भरवसा नाही. या इमारती उतरविरण्याची जबाबदारी ही घरमालकाची असल्याचे सांगत महापालिकेने हात झटकले आहेत. घरमालकांना नोटीस पाठविण्याचे कागदी घोडे तेवढे महापालिकेने नाचविले आहेत.

पडक्या झालेल्या या इमारतींमुळे परिसरातील रहिवाशी तसेच रस्त्याने ये जा करणार्‍या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षीच्या कामाचा भाग म्हणून मनपाने 114 जुन्या इमारतींना पावसाळ्यापूर्वी केवळ नोटिसा दिल्या आहेती. मात्र, ठोस कारवाई करण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील मध्यवस्तीत अजूनही अनेक जुने वाडे व जीर्ण झालेल्या मोठ्या इमारती आहेत. मोडकळीस आलेल्या इमारतीत नागरिकांचे वास्तव्य असून या इमारतीमुळे नगरकरांचा जीव धोक्यात आला आहे.
गुलमोर रोड, पाईपलाईन रस्ता, सावेडी, केडगाव, सारसनगर, विनायकनगर, स्टेशन रोड आदी नव्याने विकसित भागात जुन्या इमारती नाहीत. शहरातील जुन्या इमारतींपैकी बहुतांश ठिकाणी घरमालक व भाडेकरू यांच्यात वाद सुरू आहेत. असे बहुतांश वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहेत. मात्र, या वादामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींची साधी दुरूस्तीही झालेली नाही. या इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. तरीही अनेक कुटुंबे या इमारतींमधून राहतात. पावसाळ्यात या इमारतींची पडझड होण्याची शक्यता असते. अशा वेळी संबंधित कुटुंबांच्या जीवितासह या इमारतींच्या आसपासच्या अन्य इमारती तसेच रस्त्याने जाणारे-येणारे नागरिक, छोटी-मोठी वाहने यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या इमारती पावसामुळे पडण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर महापालिकेने धोकादायक इमारतफ असा फलकही लावला आहे. आता दरवर्षीप्रमाणे या इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावून संबंधित इमारती उतरवून घेण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत.
मोडकळीस आलेल्या इमारती उतरवून घेण्याची कायदेशीर जबाबदारी संबंधित इमारतीच्या घरमालकावर असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. तसे नोटिशीमध्ये नमूद असून, घरमालकाच्या निष्काळजीपणामुळे भाडेकरू, आसपासच्या इमारती, रस्त्याने जाणारे-येणारे नागरिक व वाहनांना काही धोका झाल्यास त्याची जबाबदारीही संबंधित घरमालकावर राहील, असे सांगताना, दुर्घटनेस मनपा जबाबदार राहणार नाही, असेही आवर्जून स्पष्ट केले गेले आहे. या इमारतींचे सर्व्हेक्षण तसेच त्यांच्या स्थितीचा अहवाल घेण्यासाठी महापालिकेने 13 बांधकाम अभियंत्यांची मदत घेतली आहे. संबंधित इमारती धोकादायक असल्याच्या त्यांच्या अहवालानुसार 114 घरे व मालमत्तांना नोटिसा दिल्या गेल्या आहेत.

या भागात आहेत धोकेदायक इमारती…
चितळे रोड, सांगळे गल्ली, वंजार गल्ली, माणिक चौक,तेलीखुंट,कोर्ट गल्ली, जुना कापड बाजार, महात्मा गांधी रोड, गांधी मैदान, चौपाटी कारंजा, बागडपट्टी, महाजन गल्ली, पटवर्धन चौक, लक्ष्मीबाई कारंजा, तोफखाना, झारेकर गल्ली, पिंजारगल्ली, सुभेदार गल्ली, काळू बागवान गल्ली, नालबंद खुंट, पारशा खुंट, रामचंद्र खुंट, डाळमंडई, मंगलगेट, किंग्ज गेट,गुजर गल्ली, गाडगीळ पटांगण अशा सुमारे 60 ठिकाणच्या परिसरात या 114 इमारती आहेत. तर स्टेशन रोडला शिवाजी चौक, सावेडीच्या श्रमिकनगर, कोठी रोडला राऊत मळा व सारसनगर येथे अशा प्रत्येकी एक इमारती आहेत.

मोडकळीस आलेल्या इमारती उतरवून घेण्याची कायदेशीर जबाबदारी संबंधित घरमालकावर आहे. घरमालकाच्या निष्काळजीपणामुळे भाडेकरू, आसपासच्या इमारती, रस्त्याने जाणारे-येणारे नागरिक व वाहनांना काही धोका झाल्यास त्याची जबाबदारीही संबंधित घरमालकावर राहील. दुर्घटनेस मनपा जबाबदार राहणार नाही. – महापालिका प्रशासन

LEAVE A REPLY

*