मराठी व सेमी इंग्रजी शाळा डिजीटल होणार

0

संगमनेर (प्रतिनिधी)ः- केंद्र व राज्य शासन वेगवेगळ्या माध्यमातून डिजिटल क्रांतीच्या दिशेने पावले टाकत असतांना महाराष्ट्र राज्यातील 18 हजार 810 शाळा डिजिटल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने रोटरी साऊथ एशिया सोसायटीशी नुकताच सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे रोटरीच्या साक्षरता मिशन कार्यक्रमांतर्गत लवकरच महाराष्ट्रातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या जवळपास सर्वच शाळा डिजिटल होणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात गरीब-श्रीमंतीची दरी अधोरेखित होत असतांना रोटरीचे सामाजिक योगदान शिक्षणक्षेत्रात सुवर्णाक्षरांनी नोंदविले जाईल असे प्रतिपादन प्रमोद पारीख यांनी केले.

 
येथील रोटरी क्लबतर्फे देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या रोटरी जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी रोटरी जिल्हा 3132 चे प्रांतपाल प्रमोद पारीख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष सुनील कडलग तर व्यासपीठावर उपप्रांतपाल राजेंद्र कोते, सचिव साईनाथ साबळे उपस्थित होते.

 
जगभर सामाजिक कार्यासाठी रोटरी इंटरनॅशनल या संस्थेला निधी पुरविणार्‍या रोटरी फाऊंडेशनला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संगमनेर रोटरी क्लबतर्फे एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. रोटरीच्या हार्मनी या विषेशांकाचे प्रकाशन प्रांतपाल प्रमोद पारीख यांच्या हस्ते करण्यात आले. हार्मनी संपादक ओंकार सोमाणी याप्रसंगी उपस्थित होते. प्रांतपाल प्रमोद पारीख यांनी रोटरी अध्यक्ष सुनील कडलग यांचेकडून हा निधी स्विकारला. याप्रसंगी रोटरी क्लबतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा रोटरी जीवनगौरव पुरस्कार येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बद्रीनाथ चांडक व नांदुरखंदरमाळ येथील सुनंदाताई गहिनाजी भागवत शैक्षणिक ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा सुनंदाताई भागवत यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

 
पुरस्कारप्राप्त बद्रीनाथ चांडक यांनी याप्रसंगी रोटरी आय केअर ट्रस्टला 11 हजार रुपयांची देणगी दिली. सुनंदाताई भागवत सत्काराला उत्तर देतांना म्हणाल्या की, उपेक्षित व वंचित मुली सांभाळतांना मी त्यांची आई झाले. या मुलींनी मला जेवढे प्रेम दिले ती माझ्या जीवनातील खरी श्रीमंती आहे. या सामाजिक कार्याच्या शिदोरीमुळेच माझे आयुष्य समृद्ध झाले आहे.

 

याप्रसंगी आनंदी रस्ते उपक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेचे विजेते बाळासाहेब पिंगळे (प्रथम), मुरारी देशपांडे (द्वितीय), सुभाष कर्डक (तृतीय), संजय पेटकर व सुभाष पवार यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय प्रितेश पोफळे यांनी करवून दिला. सन्मानपत्राचे वाचन दीपक मणियार, भारतभूषण नावंदर यांनी केले. सूत्रसंचलन सचिन पलोड यांनी तर आभार सचिव साईनाथ साबळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*