भोकर, खोकर, टाकळीभानला बिबट्याचा धुमाकूळ

0

नांदुरीदुमाला येथे महिलेवर हल्ला  प्रवरा परिसरात दर्शन  ग्रामस्थांची उडाली झोप

 

भोकर (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर शिवारात अद्याप बिबट्याचा उच्छाद सुरूच असून सध्या सुरू असलेल्या पाटबंधारेच्या आवर्तनात खोकर शिवारात कालवा निरीक्षकांना या बिबट्याने भरदिवसा दर्शन दिले तर दुसरीकडे भोकर परिसरात पहाटे पाटपाणी भरत असलेल्या शेतकर्‍यांसमक्ष या शेतकर्‍याच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढविला सुदैवाने शेजारच्या शेतातून भाऊ मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला.

 
सध्या सुरू असलेल्या आवर्तनात शेतकरी रात्रीचा दिवस करून उभी पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच खोकर शिवारात कालव्यावर असलेल्या एक औटलेट अंतर्गत भोकर व खोकर परीसरातील अनेक शेतकर्‍यांचे भरणे सुरू आहे. त्यात खोकर शिवारातील शेतकरी ताजखाँ पठाण यांच्या गट नं. 41 मध्ये सुरू असलेले भरणे झाले की नाही हे बघण्यासाठी कालवा निरीक्षक विजय जोशी हे समक्ष पठाण यांच्या शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना गुरगुरल्याचा आवाज आला आणि काही क्षणात त्याच्या डोळ्यादेखत बिबट्याने लगतच्या उसाच्या शेतात उडी मरली.

 

हा प्रकार शेजारील शेतकर्‍यांच्या लक्षात आला ते जोशी यांच्या मदतीला धावले. हे समजताच माजी सरपंच उत्तमराव पुंड व ताजखाँ पठाण घटनास्थळी धावले सर्वांना आधार देत त्यांनी वनरक्षक भाऊसाहेब गाढे यांना संपर्क साधला परंतु तोपर्यंत हा बिबट्या दिसेनासा झाला होता. अखेर काही वेळानंतर सर्वांनीच याकडे दुर्लक्ष करत पुन्हा कामाला लागले पण आता शेतकर्‍यांनी रात्रीचे भरणे कसे काढायचे? असा यक्ष प्रश्‍न सर्वासमोर आहे तसाच आहे.

 

 
तर दुसरीकडे भोकर शिवारात सुदामराव पटारे यांचे रात्री पाटपाण्याचे भरणे सुरू होते. मदतीला कुणीच नसल्याने त्यांनी आपला पाळीव कुत्रा बरोबर घेतला आणि पाणी भरणे सुरू असतानाच पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला चढविला हा प्रकार लक्षात आल्याने सुदामराव पटारे यांनी जीवाच्या आकांताने ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेले त्यांचे बंधू योगेश राजेंद्र पटारे हे त्याच्या मदतीला धावले.

 

 

दोघांच्या ओरड्याने बिबट्याने कुत्रा सोडून पळ काढला पण जखमी कुत्रा सकाळपर्यंत गायबच होता. अखेर बिबट्याच्या धास्तीने या दोघा शेतकर्‍यांनी घर गाठले. सकाळी सदर बातमी वनविभागापर्यंत गेली मात्र त्यांनी पिंजरा लावू, तुम्ही रात्रीच्यावेळी एकटे फिरू नका. स्वत:ची दक्षता घ्या असा सल्ला दिल्याने या परिसरातील शेतकर्‍यांनी या वनविभागाच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

 

 

निमगावपागा (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील 55 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

 
शारदा निवृती कवडे असे सदर महिलेचे नाव आहे. सदर महिला ही बुधवारी रात्री एक वाजता पाणी भरण्यासाठी गेली होती. पाणी भरणे आटोपल्यानंतर पती निवृती कवडे, स्वत:व मुलगा संतोष कवडे हे रात्री 1 वाजता घरी येत असताना पाटाच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शारदा कवडे यांच्यावर हल्ला केला. ज्या हातात लाईटची बॅटरी होती. त्या हाताला बिबट्याने जोराचा चावा घेतला. अचानक बिबट्याने हल्ला केल्याने मोठ्याने आरडाओरडा केला.

 

परंतु प्रसंगवधान पाहुन पती निवृती डुबे यांनी हातातील खोरे उगारून बिबट्याच्या तावडीतून आपल्या पत्नीला वाचवले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल निलेश आखाडे, पाटोळे, त्यांचे सहकारी घटनास्थळी येऊन जखमी महिलेला संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात दाखल केले. तेथे सदर महिलेवर प्राथमिक उपचार होऊन तिला घरी सोडण्यात आले.

 

परंतु सकाळी हाताची सूज वाढल्याने त्यांना संगमनेर येथे खासगी रुग्नालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. बिबट्यांचे वाढते हल्ले पाहता वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी उपाययोजना करून व्याघ्र प्रकल्पाची उभारणी करावी अशी मागणी उपसरपंच अ‍ॅड. मिनानाथ शेळके यांनी केली आहे.

 

अकोले ( प्रतिनिधी) – तालुक्यातील प्रवरा परिसरातील अनेक गावांत प्रवरा नदी परिसर व वस्ती परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले आहे. बिबट्याच्या भितीने नागरिकांची झोप उडाली आहे. वनखात्याने तातडीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

 
प्रवरा परिसरातील गर्दनी येथे अलिकडेच बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती.सुगाव खुर्द व बुद्रुक परिसरातील अनेक नागरिक बिबट्याच्या दर्शनामुळे भयभीत झाले आहेत. प्रवरा नदीचे आवर्तन सुरू असल्याने शेतकर्‍यांना रात्री बे रात्री प्रवरा नदीकडे इलेक्ट्रिक मोटर चालू बंद करण्यासाठी ये -जा करावी लागत असते. रात्री बेरात्री कुठेना कुठे बिबट्याचे दर्शन घडत असल्याने शेतकरी घाबरून गेले आहेत.काहींना तर दिवसा ढवळ्या बिबट्याने दर्शन दिले आहे.

 

शेतातून भर रस्त्यावर अनेकांनी बिबट्या पाहिल्यानंतर अनेकांची पाचावर धारण बसली. सायंकाळी तसेच रात्रीच्यावेळी बिबट्याच्या दहशतीमुळे घराबाहेर पडायला लोक घाबरू लागले आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत व तापमान वाढलेले आहे, यामुळे लोक घराच्या अंगणात, पडवीत, बंगल्यात पोर्चमध्ये झोपतात मात्र बिबट्याच्या भितीमुळे ते घराबाहेर झोपायला घाबरू लागले आहेत. परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्याने नागरिकांचे पाळीव कुत्रे संपविले आहेत. बिबट्याच्या भितीमुळे रहिवासी खूप घाबरून गेले आहेत.

 

 

बिबट्याला जर अपेक्षित भक्ष्य शोधताना खायला काही मिळाले नाही तर तो माणसांवर हल्ला करून जखमी करू शकतो किंवा ठारही मारू शकतो. याचा विचार करून वनखात्याने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी प्रवरा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

 

टाकळीभान (वार्ताहर)- टाकळीभान टेलटँक परीसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असून बुधवारी रात्री या परिसरातील सुबोध माने यांच्या घराजवळील गोठ्यातील शेळीचा बिबट्याने फडशा पाडला. गेल्या महिन्यापासून बिबट्याने उच्छाद मांडल्याने रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणारे शेतकरी दहशतीखाली असून वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकर्‍यांत संताप व्यक्त होत आहे.

 
येथील टेलटँक परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे.रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणार्‍या शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.या परिसरात वस्तीवरील अनेक कुत्र्यांचाही बिबट्याने फडशा पाडलेला आहे. या परिसरात फिरणार्‍या मेंढपाळांच्या कळपावरही बिबट्याने हल्ला करून एका मेंढीची शिकार केलेली आहे.

 
गेल्या वर्षीही या परिसरात बिबट्याने दहशत केल्याने वनविभागाने पिंजरा लावला होता. मात्र बिबट्याने पिंजर्‍याला हुलकावणी दिली होती.सध्या हा पिंजरा शंकरराव पवार यांच्या वस्तीवर आडगळीत पडलेला आहे.त्यामुळे बिबट्याची वर्दळ असलेल्या जागी पिंजरा लावण्याची मागणी होत असली तरी वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आसल्याने नागरीकात असंतोेष निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

*