भीषण अपघातात राहुरीचे 7 ठार

0

मृतात उपसरपंचाचा समावेश, फॅक्टरीहून राहुरीकडे परतताना काळाचा घाला

 

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – भरधाव राहुरी फॅक्टरीहून राहुरी शहराकडे निघालेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात स्कार्पिओतील सात तरूण ठार झाले. हे सर्वजण राहुरी तालुक्यातील होते. ही दुर्घटना नगर-मनमाड महामार्गावरील एस्सार पेट्रोल पंपासमोर राहुरी शहरानजिक सायंकाळी  7 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात चारजण राहुरी तालुक्यातील वळण येथील, दोघेजण मानोरी येथील तर वरवंडी येथील उपसरपंच सचिन ढगे यांचा समावेश आहे.

 

चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर स्कार्पिओ महामार्गालगत असलेल्या उंबराच्या झाडावर आदळून हवेत उंच उडाली. नंतर महामार्गावर दोन पलट्या खाऊन लगतच्या शेतात जाऊन पडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. तर मयतांच्या चेहर्‍यांनाही जबर मार लागल्याने प्रत्येकाची ओळख त्यांच्या खिशात असलेल्या मोबाईलवरून व ओळखपत्रावरून पटली. या दुर्दैवी घटनेमुळे राहुरी तालुक्यासह मानोरी, वळण, वरवंडी गावावर शोककळा पसरली आहे.

 

सायंकाळच्या सुमारास स्वमालकीची स्कार्पिओ गाडी घेऊन वरवंडीचे उपसरपंच सचिन ढगे हे आपल्या वळण व मानोरी येथील मित्रांसमवेत राहुरी फॅक्टरी येथे काही खासगी कामानिमित्त गेल्याची माहिती मिळाली. सायंकाळी 6.45 ते 7 वाजण्याच्या सुमारास राहुरीच्या दिशेने परतताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. स्कार्पिओ गाडी राहुरी महाविद्यालय ओलांडून राहुरीच्या दिशेने पुढे आल्यानंतर अचानक वाहनाने वेग घेतला.

 

त्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. महामार्गावरच हेलकावे खात असताना स्कार्पिओ लगतच्या उंबराच्या झाडावर जाऊन आदळली. त्यानंतर वाहन उंच उडाले. महामार्गावर दोन पलट्या खाल्ल्यानंतर हे वाहन नजिकच्या शेतात जाऊन कोसळले. हे वाहन हवेत उडाल्यानंतर आतमध्ये बसलेले तिघेजण अक्षरशः काचा फुटून बाहेर हवेत फेकले गेले. त्यातील एकजणाचा मृतदेह उंबराच्या तुटून पडलेल्या फांदीखाली अडकला होता. उर्वरित चौघाजणांचे मृतदेह वाहनातून अक्षरशः दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले.

 

ही घटना पाहणार्‍या अनेक प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा थरकाप उडाला होता. अत्यवस्थ असलेल्या उपसरपंच सचिन ढगे यांना नगर येथे उपचारासाठी नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. तर उर्वरित सहाजण या अपघातात जागीच ठार झाले होते.
त्यांचे मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर तेथे प्रचंड गर्दी जमली. मृताच्या नातेवाईकांनी मोठ्याने हंबरडा फोडल्याने अनेकांचे डोळेही पाणावले. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, सचिन ढगे यांच्यासह अन्य सातजणांच्या पार्थिवदेहावर रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच डॉ. जयंत कुलकर्णी, राजू शेटे, योगेश देशमुख, राजू मकासरे, डॉ. विजय मकासरे, संदीप गागरे, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी पोलिसांना मदत केली आाणि नातेवाईकांचे सांत्वन केले.

 

आमदार शिवाजीराव कर्डिले, तसेच नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनीही भेट दिली व मदतीच्या सूचना केल्या.
अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी व ग्रामीण रूग्णालयात राहुरी तालुक्यातील नातेवाईक, कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी जमली. पोलिसांचाही फौजफाटा तैनात करण्यात आला. रूग्णालयाबाहेर मयतांच्या नातेवाईक आणि मित्रांची रडारड सुरू होती. त्यामुळे अनेकांचे काळीज पिळवटून निघाले.

मृतांमध्ये वरवंडी येथील सचिन पंढरीनाथ ढगे, अरूण विश्‍वनाथ थोरात (मानोरी), महेश विलास कोळसे (मानोरी), सतीश चंद्रभान शेळके, नाथा राजेंेंद्र डमाळे, सुरेश एकनाथ खुळे, महेश विष्णु पवार (वळण-पिंप्री) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे वळण, मानोरी, वरवंडीवर शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

*