भाजपचे मिशन महापालिका

0

  नवख्यांनी पहिल्या रांगेचा हव्यास सोडा : दानवे

किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी यांचा भाजप प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी)– देशात, राज्यात आता भाजपची लाट आहे. या लाटेत विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीला कोणतेच भवितव्य दिसत नाही. त्यामुळेच भाजप प्रवेशासाठी अनेकांची रिघ लागली आहे. किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी यांचा पक्ष प्रवेश हा ‘फेज 1’ असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अहमदनगर महापालिकेवर सत्तेचा नारा दिला. हा नारा देतानाच दानवे यांनी पक्षात नव्याने प्रवेश करणार्‍या डागवाले, कुलकर्णी यांना सयंम ठेवण्याचे आवाहन करत पहिल्याच रांगेत खुर्ची हवी ही भूमिका घेऊ नका असा सल्लाही दिला.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्म शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नगरसेवक किशोर डागवाले, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार भिमराव धोंडे, खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर श्रीपाद छिंदम, माजी उमहापौर गीतांजली काळे, सुवेंद्र गांधी, मनेष साठे, महेश तवले, बाबासाहेब वाकळे व्यासपीठावर उपस्थित होते.
दानवे म्हणाले, इतर पक्षातून भाजपात प्रवेश करणार्‍यांना प्रवेशाच्या आदल्या रात्री झोपच लागत नाही. भाजपात चाललो, पण तिथं कोणी जीव लावेल की नाही. इथं (जुन्या पक्षात) सगळे ओळखीचे होते. रेटारेटी करून पहिल्या रांगेतील खुर्चीत बसायचो, तिथं तर कोणी ओळखीचेही नाहीत असे विचार मनात येऊन असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मात्र पक्षात येणार्‍यांचा इतिहास तपासला तर कोणावरही अन्याय होत नाही. काम करणार्‍यांना न्याय मिळतो. मात्र पहिल्याच रांगेतील खुर्ची हवी अशी भूमिका नव्याने प्रवेश करणार्‍यांनी घेऊ नये. मलाही अध्यक्ष पदापर्यंत पोहचण्यास 37 वर्षे लागली. आज पक्षात प्रवेश करताच उद्या पदं मागतात. मात्र तसे करू नका. सयंम ठेवा, न्याय मिळतोच.
देशात व राज्यातही भाजप नंबर एकचा पक्ष आहे. भाजपात इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे पक्ष प्रवेश करणार्‍यांसाठी भाजपचे उपरणे कमी पडणार नाही याची काळजी दिलीप गांधी यांनी घेतली पाहिजे. विकासाची दिशा देण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. शहरालाही विकास हवा आहे. त्यासाठी महापालिकेवरही भाजपची सत्ता यावी असा नारा देत दानवे यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग दीड वर्षे अगोदरच फुंकले.

मी माणसं ओळखणारा माणूस आहे. चेहर्‍यावरून मला भविष्य कळतं. कोपर्‍यात पडलेल्या साखरेचा शोध घेत मुंगी बरोबर तिथंपर्यंत पोहचते. तसं आता नगर शहराचंही झालं आहे. प्रवेशाची ही फेज 1 आहे. कानाकोपर्‍यातून कार्यकर्ते भाजपात येतील. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता येईल.

……प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

देशात, राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर नगर शहरही एका विचाराकडे वाटचाल करत आहे. शहरातील जनतेला विकास हवा आहे. पक्षात नव्याने आलेल्यांना सामावून घेतले जाईल. पक्षाचा विस्तार आणि विश्‍वास देण्यासाठी मला शहर जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली आहे. आम्ही जे काही करतो ते पक्षासाठीच आहे. 

…..खासदार दिलीप गांधी

LEAVE A REPLY

*