भंडारदरा 27 टक्के भरले मुळातही आवक सुरू

0

वाकी तलाव ओव्हरफ्लो निळवंडेत नवीन पाणी रतनवाडीत 9 इंच नोंद मुळा नदीही दुथडी

 

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर) –  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर आणि रतनवाडीत आद्रा नक्षत्राच्या सरींचे तांडवनृत्य सुरू असल्याने गत बारा तासांत धरणात विक्रमी 598 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल्याने सायंकाळी पाणीसाठा 3080 दशलक्ष घनफूट (27 टक्के) झाला होता. शुक्रवारी रात्रीही जोरदार पाऊस सुरू असल्याने आजही धरणात विक्रमी पाण्याची आवक होणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आज 32-35 टक्के होणार आहे.

 

 

112 दलघफू क्षमतेचा वाकी तलाव दुपारी 4 वाजता ओव्हरफ्लो झाला असून कृष्णवंती नदी प्रवाहित झाल्याने निळवंडे धरणातही प्रथमच आवक सुरू झाली आहे. मुळा पाणलोटातही मुसळधार पाऊस सुरू झाल्याने आंबित, पिंपळगाव खांडनंतर बलठाण धरणातही मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दोन दिवसांत हे धरण भरण्याची शक्यता आहे.

 

 

काल सकाळी संपलेल्या बारा तासांत भंडारदरात केवळ 35 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले होते.त्यानंतरच्या बारा तासांत भंडारदरा धरणात तब्बल 598 दलघफू पाणी नव्याने जमा झाले. त्यात 35 दलघफू पाण्याचा वापर झाला तर अन्य पाणी धरणात जमा झाले. या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

 

 

घाटघर आणि रतनवाडीत आर्द्रा सरींचे तांडव सुरू असल्याने डोंगरावरून वाहणारे धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करीत असून ओढे नाल्यांना पूर आला असून हे पाणी धरणात विसावत असल्याने धरणाचे पोट फुगू लागले आहे. भात खाचरांमध्येही पाणीच पाणी झाले आहे.

 

 

दरम्यान, मुळा पाणलोटातही पावसाचा जोर कायम असून हरिश्‍चंद्र गड, कळसूबाईचे शिखर, आंबित, पाचनई, कोथडे या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने असून मुळा नदीतील विसर्ग वाढला आहे. कोतूळ येथून 6592 क्युसेकने मुळा धरणाकडे झेपावत असून धरणात प्रथमच या भागातील पाण्याची आवक रात्री सुरू झाली होती. यापूर्वी झालेली आवक पारनेरमध्ये झालेल्या पावसाची होती.धरणात सध्या 4904 दलघफू पाणीसाठा आहे.

 

 

कुकडी ः 475 दलघफू पाण्याची आवक

नगर जिल्ह्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असणार्‍या कुकडी प्रकल्प पाणलोटात पाऊस सुरू असल्याने या धरणांतही पाण्याची आवक सुरू आहे. गत 24 तासांत 475 दलघफू पाणी दाखल झाल्याने या समूहातील पाणीसठा 2011 दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. येडगाव पाणलोटात 4, माणिकडोह 28, वडज 13, पिंपळगाव जोगा 34, डिंभे 39 मिमी पाऊस झाला. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा 6.58 टक्क्यांवर पोहचला आहे.

 

 

अकोलेत सर्वदूर पाऊस
अकोले तालुक्यात प्रथमच सर्वदूर पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. मंडलनिहाय पडलेल्या पावसाची आकडेवाडी मिमी. अकोले 47, राजूर 36, ब्राम्हणगाव 13, समशेरपूर 21, कोतूळ 21, वीरगाव 20, साकीरवाडी 39.

LEAVE A REPLY

*