बोअरवेलमध्ये मृत्यूप्रकरणी मालकाविरोधात गुन्हा

0

नगर जिल्ह्यात प्रथमच गुन्हा दाखल, सात वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील मुर्शतपूर येथील शेतमजूर प्रमोद बारहाते यांचा आठ वर्षाचा साईश्‍वर सोमवारी सकाळी 11.30 शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये 15 ते 16 फूट खोल खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून बोअरवेल मालक उध्दव पर्बत देवकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद बारहाते यांनी एक वर्षापूर्वी मुर्शतपूर येथील उद्धवराव जीवराज देवकर यांची जमीन बटाईने करायला घेतली. मोलमजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत असे. शेतात मका पीक काढणीचे काम चालू होते. मका पिकाचे शेळ्या दाणे खात होते म्हणून साईश्वर या शेळ्यांना हाकलत होता. त्याचवेळी साईश्वरचा शेतातील उघड्या कुपनलिकेत तोल गेला.
तो 15 ते 16 फूट खोल खाली पडला. त्याच्याबरोबर असणारी समीक्षा हिने आरडाओरडा केला. मदतीसाठी हाका मारल्या तेव्हा प्रमोद बारहाते हे धावत धावत त्या ठिकाणी आले व त्यांनी ताबडतोब प्रसंगावधान राखून एक बांबू आणला चिमुकल्या साईश्वरने बांबुला धरले, परंतु त्याच्या चिमुकल्या हाताला जास्त वेळ बांबू धरता आला नाही तो बांबू सटकला व तो आणखी पाच फूट खाली गेला कूपनलिकेतून मुलाच्या रडण्याचा आवाज सुमारे तासभर चालू होता.
वडिलांनी शेजारी पाजार्‍यांना हाका मारल्या गाव गोळा झाले पण या कूपनलिकेतून या चिमुकल्याचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न तोकडे पडले. यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केले. त्यातून त्याला बेशुध्द अवस्थेत बाहेर काढण्यात यशही आले, पण रूग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी अखेर पित्याने फिर्याद दिली. त्यावरून बोअर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा गुन्हा दाखल होण्याची बहुदा पहिलीच वेळ आहे.
 पिता प्रमोद बाराहाते यांनी फिर्यादीत म्हटले की, उध्दव देवकर यांनी शेतातील बंद पडलेल्या, पाणी नसलेली कुपनलिका न बुजविता उघडी ठेवली असता माझा मुलगा साईश्‍वर हा शेतात आलेल्या शेळ्या हाकण्यासाठी पळत जात असताना त्या कुपनलिकेत पडला. त्यावरुन पोलिसांनी भादंवि कलम 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा गुन्हा नगर व महाराष्ट्रात प्रथमच दाखल करण्यात आला आहे. या कलमान्वये आरोपीस 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

*