बेलपिंपळगाव परिसर सलग तीन दिवस अंधारात

0

वाड्या-वस्त्या सिंगल फेजपासून  वंचित; ग्रामस्थांमध्ये संताप

 

बेलपिंपळगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव व परिसरात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला असून सलग दोन-तीन दिवस वीज गायब राहात असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

 
वीज नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला व लहान मुले पाण्यासाठी गावाच्या परिसरातील विहिरींच्या शोधात फिरताना दिसत असून ऐन पावसाळ्यात शेंदून पाणी आणण्याची वेळ आली आहे.

 

 
जनावरांच्या पाण्याचे हाल होत आहेत. पावसाचे वातावरण निर्माण झाले, थोडे वादळ झाले तरी संपूर्ण वीजपुरवठा खंडित केला जातो. हा खंडित केलेला वीजपुरवठा दोन-तीन दिवस सिंगल फेजसह बंद ठेवला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व मुलांसह घरातील सर्व मंडळींचे हाल होतात.

 

 
घरात झोपावं तर विजेअभावी पंखे-कुलर चालू शकत नाहीत. बाहेर झोपावं तर पावसाळी वातावरणामुळे वीज कोसळण्याची भीती अशा दुहेरी अडचणीत परिसरातील लोक आहेत.

 
परिसरातील सर्वात मोठे गाव असले तरी गावासाठी वीज कंपनीचा अवघा एक वायरमन आहे. ते हजर असतात मात्र एवढ्या मोठ्या परिसरासाठी ते पुरेसे नाहीत. येथे आणखी वायरमनची गरज आहे.

 

येथील अनेक वाड्यावस्त्यांबरोबरच अद्याप अर्ध्या गावात सिंगल फेज वीज नाही. अर्धे काम बाकी आहे कायम विनंती, लेखी अर्ज करून देखील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

 

 

सध्या विजेच्या सुरू असलेल्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत. वीज आल्यास किती वेळ राहील याची शाश्‍वती नसते. या भागात सिंगल फेजचे अपूर्ण काम पूर्ण करावे. पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरळीत करावा व पुरेसे कर्मचारी नेमावेत, शेतकर्‍यांचे होणारे हाल वीज मंडळाने लवकरात लवकर थांबवावे. वाडी-वस्त्यांवरील सिंगल फेजची कामे मार्गी लावावीत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे गणेश चौघुले व ग्रामस्थांनी दिला आहे. 

LEAVE A REPLY

*