बदल्यांमुळे शिक्षक धास्तावले

0

गणोरे (वार्ताहर) – काय होणार? कसे होणार? किती बदल्या होणार? आपल्याला खो तर मिळणार नाही ना? न्यायालयाच्या सुनावणीचे काय झाले? स्थगिती कायम राहणार का? मंत्रालयाच्या बैठकीचे काय झाले? शुध्दीपत्रक कधी निघणार? असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करून शिक्षक बदल्यांना सामोरे जात आहेत.

एकाच वेळी अनेक प्रकारचे प्रश्न ग्रामविकास मंत्रालयाच्या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या बदली आदेशासंदर्भाने विचारले जात आहेत. अनेकांनी कुटुंबासह उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजन केले असताना या बदल्यांच्या आदेशाबाबत अनेक तर्कवितर्क सामाजिक माध्यमांत नोंदविले जात असल्याने सध्या शिक्षणात बदली हाच एकमेव गंभीर विषय बनला आहे.
राज्यात 27 फेब्रुवारी रोजी ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भाने काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे अवघड व सोपे क्षेत्र असे वर्गीकरण करीत बदल्यांची भूमिका घेतली. त्या शासन निर्णयांचा अनेकांना अर्थ न लागल्याने सामाजिक माध्यमांमध्ये त्यावर उलटसुलट चर्चा झाली.

त्या बाबत अनेक संघटना न्यायालयात गेल्या. काही जिल्हा संघटनांना बदल्यांना स्टे मिळविण्यात यश आले. त्यामुळे त्या त्या जिल्हा परिषदांतील कार्यवाही थांबविण्यात आली आहे. तर काही जिल्हा परिषदांनी अवघड क्षेत्रच नसल्याचे जाहीर करीत बदल्यामंधील गोंधळ कमी केला आहे.
सध्या व्हॉट्सअ‍ॅप वरती स्वतंत्र समूहगट स्थापन करण्यात आले आहे. बदली एके बदली असाच तो विषय राहिला आहे. त्याच बरोबर इतर गटातही बदलीची चर्चा रंगत आहे. यात सवंर्ग एक मध्ये विविध कारणांनी सवलत पात्र आहे. तर दोन मध्ये पतीपत्नी यांना तीस किलोमीटरच्या कार्यक्षेत्रात ठरविणे बाबत सवलत आहे.

त्या करिता अंतराचा दाखला किवा अंतर लिहिताना ते काढणे हेही डोकेदुखी ठरत आहे. राज्यात बदल्यांबाबत असलेल्या संभ्रमांच्या स्थितीत बदल्यांचा आदेश रद्द करून पूर्वीच्याच आदेशाप्रमाणे बदल्या करा अशी मागणी करणारा एक समूह आता पुढे येत आहे.

सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, मुंबई, औरगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भाने शासनाला म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे या सुनावण्याच्या दरम्यान न्यायालय काय निकाल देणार? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

या दरम्यान अनेकांनी उन्हाळी पर्यटन दौरा निश्चित केला होता. मात्र बदल्यांच्या खो खो खेळात आपल्याला धक्का बसला तर काय? या भीतीने त्यांनी काढलेली तिकीटे सुध्दा रद्द केली आहेत.

चर्चा गुणवत्ता ढासळण्याची
राज्याच्या शालेय गुणवत्ता विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जात असून राज्यात शाळांचे स्वरूप बदलत आहे. अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे चित्र सकारात्मक बदलत असताना या शासन निर्णयाने अनेकांच्या बदलीला खो बसणार असून बदलीने शाळांवरचे चित्र अस्थिर होईल. त्यामुळे त्याचा फटका शाळांच्या गुणात्मक बदलावर विपरीत स्वरूपात होईल असा सूर सामाजिक माध्यमातून उमटत आहे.

LEAVE A REPLY

*