बचाव पक्षाच्या यादीत आता मुख्यमंत्री साक्षीदार?

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार्‍या कोपर्डी बलात्कार प्रकरणी न्यायालयात जबाब नोंदवण्याचे काम सुरु असून बचाव पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साक्षीदार म्हणून बोलावण्याची मागणी केली आहे. आरोपी नितीन भैलुमे याचे वकील प्रकाश आहेर यांनी याबाबत अर्ज न्यायालयात सादर केला आहे.

 

या अगोदर त्यांनी विशेष सरकारी वकिल उज्जल निकम, जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या साक्षीसाठीही अर्ज केलेला आहे.

 

गुन्हा घडल्यानंतर फडणवीस यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते की; आरोपींना एका महिन्यात शिक्षा लागण्यासाठी अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या खटल्यात बर्‍याच काही घटना रचण्यात आल्या आहेत. म्हणून आम्हाला हे दोन साक्षीदार तपासायचे आहेत. या अर्जावर सरकार पक्षाचे म्हणणे मागितले असून अ‍ॅड. खोपडे व आहेर यांच्या अर्जावर 7 जुलै रोजी अ‍ॅड. निकम म्हणणे मांडणार आहेत.

 

कोपर्डी अत्याचार प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात तीन आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले.

 

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे व दुसरा आरोपी संतोेष भवाळ यांच्यानंतर शुक्रवारी या गुन्ह्यातील तिसरा आरोपी नितीन भैलूमे याचे जबाब नोंविण्यात आले.
भैलुमेला जबाब देताना रडू कोसळले

 

भैलूमे याच्यावर कट रचल्याचा आरोप आहे. त्याने सांगितले की; मी या घटनेच्या वेळी आरोपींसोबत नव्हतो. मोेर्चे, आंदोलने झाल्यानंतर मला टार्गेट करण्यात आले. पोलिसांनी माझी नार्को टेस्ट केली. त्याचा अहवाल दोषारोपपत्रात लावण्यात आलेला नाही.

 

 

मुंबई येथे दातांचे नमुने घेण्यात आले असे पोलिसांनी सांगितले. मात्र माझ्या दातांचे कोणतेही नमुने घेतले नाही. फक्त दुरून एक माझा फोटो काढला होता. या गुन्ह्यात बरेच साक्षीदार असे आहेत की, जे पीडित मुलीचे भाऊ, बहिण, काका, आजोबा असे नातेवाईक आहेत. तसेच एकाही साक्षीदाराने माझी सत्य ओळख सांगितली नाही. माझे नाव देखील चुकीचे सांगण्यात आले आहे. खरे तर मी पुण्यात शिक्षण घेत आहे. त्यामुळे माझा कोपर्डीशी काही संबंध नाही.

 

 

मात्र तपासी अधिकार्‍यांनी मला काही गोष्टी खोट्या सांगून माझी दिशाभूल केली. त्यामुळे या घटनेत मला गोवण्यात आल्याचे भैलुमे म्हणाला. घटनेतील काही गोष्टी खोट्या असल्याचे सांगताना भैलुमेला भावना अनावर झाल्या होत्या. त्यामुळे काही काळ वातावरण भावनिक झाले होते.

 

 

दरम्यान आरोपी संतोष भवाळचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे यांनी साक्षीदार म्हणून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम व जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्यासह सहा साक्षीदारांना तपासावे अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. यावर अ‍ॅड. निकम यांचे म्हणणे मागविले आहे. अ‍ॅड. आहेर यांनी मुख्यमंत्री व ज्येष्ठ पत्रकार यांना तपासण्यासाठी अर्ज दाखल केल्यामुळे निकम यांनी दोन्ही अर्जावर 7 जुलै रोजी म्हणणे सादर करणार असल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरुन पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

आरोपीच्या वकीलाला धमकी
संतोष भवाळ याचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे यांनी न्यायालयात एक अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांना गुरूवारी रात्री एका मोबाईलवरुन तुझ्याकडे पाहुन घेतो अशी धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात ते हे पुण्यातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती खोपडे यांनी दिली.

 

 

सुनावणीला बसण्यास परवानगी द्यावी
कोपर्डी घटना देशात गाजत आहे. या खटल्यात 31 महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले आहेत. आज तीन आरोपींचे जबाब पूर्ण झाले आहेत. त्यामुळे हा खटला आता अंतिम टप्प्यात आहे. या सुनावणीदरम्यान पत्रकारांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे अ‍ॅड. निकम यांनी पत्रकार व सामान्य नागरिकांना खटल्यादरम्यान बसू द्यावे असा विनंती अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खटला सुरू असताना तो ऐकण्याची संधी सर्वांना मिळण्याची शक्यता आहे. यावर 7 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*