‘फेज टू’च्या पाण्याला 15 ऑगस्टची डेडलाईन

0

महापौरांचे आदेश नागापूर, भिस्तबाग, निर्मलनगरच्या टाक्या कार्यान्वीत होणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- गत सात वर्षापासून रेंगाळलेल्या शहर सुधारीत पाणी योजनेंतर्गत (फेज 2) निर्मलनगर, नागापूर व भिस्तबाग येथील साठवणा टाकीतून 15 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश महापौर सुरेखा कदम यांनी प्रशासनाला दिले. प्रशासनाने ठेकेदार एजन्सीला तसे बजावले असून 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याची तंबी दिली आहे.

नगरवासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेली फेज 2 पाणी योजना सात वर्षानंतरही पूर्णात्वास गेलेली नाही. 74 कोटी रुपयांची ही योजना आता 116 कोटी रुपयांवर जाऊन पोहचली आहे. जून 2010 साली योजनेचे प्रत्यक्षात काम सुरू झाले. तीन वर्षाची मुदत असताना प्रत्यक्षात मुदतवाढ देत योजनेचे काम सुरू आहे.
महापौर सुरेखा कदम यांनी गुरूवारी महापालिकेत पाणी योजनेच्या कामाचा आढावा घेतला. सभापती सचिन जाधव, सभागृह नेते अनिल शिंदे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक मनोज दुलम, उषा ठाणगे, शरद ठाणगे, उपायुक्त अजय चारठाणकर, यंत्र अभियंता परिमल निकम, अभियंता एम.डी.काकडे यांच्यासह सल्लागार एजन्सी व ठेकेदार एजन्सीचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
विळद ते नागापूर पर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून त्याची जलदाब चाचणी घेतली जाणार आहे. डीएसपी चौक ते सरोषबागपर्यंत पाईप टाकण्याचे काम रमजान ईदनंतर हाती घेतले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने बैठकीत दिली. शिवाजीनगर येथील टाकीतून पाणी वितरण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची सूचना महापौर कदम यांनी केली. सावेडी उपनगरातील निर्मलनगर, भिस्तबाग व नागापूर येथील साठवण टाक्यांतर्गत वितरण व्यवस्थेचे काम तातडीने पूर्ण करावे. रोज किमान तीन किलोमीटरची लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे. 15 ऑगस्टपर्यंत या तिन्ही टाकीतून पाणी वितरण झाले पाहिजे असे आदेश महापौर कदम यांनी दिले.
पाईपलाईन टाकल्यानंतर ती बुजविताना माती रस्त्यावर राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाईपलाईनच्या नालीचे खड्डे व्यवस्थित बुजविण्यात यावेत. एचडीपीई पाईपचा साठा करून ठेवावा. पाईपामुळे काम बंद व्हायला नको अशी सूचना सभागृह नेते अनिल शिंदे यांनी केली.
गत अनेक वर्षापासून फेज2 चे काम सुरू आहे. सल्लागार एजन्सी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हे काम पूर्णत्वाच्या दृष्टीने कार्यवाही करावी. महापालिका व ठेकेदार यांच्याशी समन्वयाने हे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना सभापती सचिन जाधव यांनी केली.
उपायुक्त अजय चारठाणकर यांनी ठेकेदार व सल्लागार एजन्सीने दररोजच्या कामाचा आढावा महापालिका पदाधिकार्‍यांना दिला पाहिजे असे आदेश देत निर्मलनगर, भिस्तबाग व नागापूर येथील टाकीतून 15 ऑगस्टपर्यंत पाणी वितरण झाले पाहिजे अशी तंबी ठेकेदार एजन्सीला दिली.

सात वर्षानंतरही अपूर्णच
जून 2010 मध्ये फेज 2 पाणी योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. तीन वर्षात हे काम पूर्ण करण्याची अट आदेशात होती. प्रत्यक्षात आज सात वर्षे उलटून गेली तरी अजूनही योजनेचे काम पूर्णात्वास गेलेले नाही. 2010 साली 74 कोटी रुपये खर्च असलेल्या योजनेचा खर्च आता 116 कोटी रुपयांवर जाऊन पोहचला आहे. योजना सुरू करताना 355 किमी पाईप टाकले जाणार होते, आता हे अंतरही 565 किमीपर्यंत पोहचले आहे.

नव्या वसाहती तहानलेल्याच
शहरात सात वर्षाच्या काळात अनेक भागात नव्याने वसाहती (कॉलनी) उभ्या राहिल्या. काम सुरू झाले त्यावेळी या वसाहती नव्हत्या. त्यामुळे या नवीन वसाहतीमध्ये फेज टू पाणी योजनेचे जाळे टाकण्यात अडचणी येत आहे. पूर्वीच्या डिझाईनमध्ये कॉलनीच नसल्याने ठेकेदारानेही काम करण्यास नकार दिला आहे. प्रशासनानेही आता वाढीव अंतराच्या कामाकडे दुर्लक्ष करत 565 किमीचे काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे. नव्याने उभारलेल्या वसाहतींना भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी लढा उभारावा लागेल असे चित्र निर्माण होऊ पाहत आहे.

LEAVE A REPLY

*