फुटक्या ड्रेनेजचा वास दिल्लीगेटच्या नाकातोंडात

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्ली गेट परिसरातील रस्त्याच्या बाजूला असणारी ड्रेनेज पाईप लाईन फुटल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून महापालिकेला या ड्रेनेजची पाईप लाईन दुरूस्त करण्यास आठ ते दहा दिवसापासून सवड मिळालेली नाही. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पाईप लाईन फुटून पाणी रस्त्यावर वाहत आहे, त्यालगत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे कार्यालय आहे.
शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाणी म्हणून दिल्ली गेट ओळख आहे. या ठिकाणाहून दररोज हजारो नगरकरांचा प्रवास सुरू असतो. सकाळी 8 पासून या भागात शाळा, महाविद्यालय, नोकरदारांची धावपळ दिल्लीगेटच्या रस्त्यावरून सुरू असते. मध्यशहर आणि उपनगरला जोडणारा हा सर्वात जवळचा रस्ता आहे. यामुळे या ठिकाणी अनेक वेळा नगरकरांना वाहतूक कोंडीला समोरे जावे लागते. दिल्लीगेटच्या वेशीजवळ पॅगो चालक, रिक्षा चालक यांच्या मनमानीमुळे नगरकर नेहमीच त्रस्त असतात.
दिल्लीगेट भागात सकाळी आणि सायंकाळी मोकाट जनावरांची समस्या कायम असतांना आता फुटलेली ड्रेनेज आणि ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्येला या भागातील नागरिक आणि येथून प्रवास करणार्‍यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मैलमिश्रीत पाणी रस्त्यावरून वाहत आहे. ज्याठिकाणी ड्रेनेज लाईन फुटली आहे त्यालगतच उपमहापौर छिंदम यांचे कार्यालय आहे. महापालिका प्रशासन आणि छिंदम यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सध्या ड्रेनेजलाईन मधील घाण दररोज रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे या परिसरात मोठी दर्गंधी पसरली आहेे. या ठिकाणाहून तर पायी चालणे मुश्किल झाले आहे. भरधाव धावणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनामुळे या ठिकाणी रस्त्यावर साचले पाणी पायी चालणार्‍यांच्या अंगावर उडून भांडणे होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे महापालिकेने तातडीने फुटलेल्या ड्रेनेज लाईनची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

  देशाच्या स्वच्छ शहराच्या यादीत नगर शहराचा 183 क्रमांकावर नंबर आलेला आहे. पुढील काळात हा क्रमांक 100 च्या आत आणण्याचे स्वप्न नगरचे राजकीय नेते पाहत आहे. मात्र, 8 ते 10 दिवस शहरातील एका मुख्य मार्गावरील फुटलेल्या ड्रेनेज लाईनची दुरूस्ती होत नसले तर स्वच्छतेच्या यादीत येऊन उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*