‘फिरोदिया’त उद्या राज्यस्तरीय संगीत स्पर्धा

0

राज्यातील 75 गायकांचा सहभाग, नगरकरांना उद्या संगीत मेजवानी 
उपेंद्र भट यांच्या हस्ते बक्षिस वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरमधील रसिकांना उद्या सकाळी संगीताची मेजवाणी मिळणार आहे. कसलेल्या गायकांच्या गळ्यातून निघणारा भक्तीचा टाहो कानी पडणार आहे. अ.ए.सोसायटी व अशोकभाऊ फिरोदिया मेरीट फाऊंडेशनतर्फे सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व.अशोकभाऊ फिरोदिया व माजी सहकार्यवाह स्व.सुरेश भालेराव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्या सकाळी 7 ते 8.30 या वेळेत भक्तीसुमन संगीत स्पर्धा घेतली जाणार आहे, संयोजिका छायाताई फिरोदिया यांनी ही माहिती दिली.
स्पर्धा एकूण दोन सत्रामध्ये होणार आहे. अ.ए.सोसायटीच्या शास्त्र प्रयोगशाळा क्रमांक दोनच्या हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये मोठ्या गटाचे प्रथम बक्षीस रु. 21,111, दुसरे 15,555 रूपये, तिसरे 9,999 रूपये व उत्तेजनार्थ 1,111 रूपये आहे. लहान गट- प्रथम बक्षीस 9,999 रूपये, दुसरे 5,555 रूपये, तिसरे 3,333 रूपये व उत्तेजनार्थ 1,111 रूपये. या व्यतिरिक्त सहभागी स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या भक्तीसुमन स्पर्धेमध्ये मराठी भाषेतील अभंग, संतरचना, मराठी चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर आधारित भक्तीरचनांचा समावेश करण्यात आला आहे.
फिरोदिया म्हणाल्या, मागील वर्षीही या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यंदा या स्पर्धा राज्यस्तरीय घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. संगीत क्षेत्रात विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. स्पर्धेसाठी नाशिक, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, सिंधूदुर्ग, अहमदनगर तसेच राज्यातील ग्रामीण भागातील स्पर्धकही हजेरी लावणार आहेत. प्रथम नोंदणी करणार्‍या स्पर्धकांच्या हस्तेच प्रारंभ केला जाईल. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रसिद्ध गायक पवन नाईक हे काम पाहत आहेत.
या स्पर्धेच्या नियोजनासाठी विविध समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठतम शिष्य व जगविख्यात शास्त्रीय व अभंग गायक उपेंद्रजी भट यांच्या हस्ते सायंकाळी होणार आहे. नगरमधील संगीत रसिकांना ही एक भक्ती गजराची पर्वणीच मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*