प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामे करा

0

खा.लोखंडेः बाभळेश्‍वर येथे नुकसानीची पहाणी

 

बाभळेश्‍वर (वार्ताहर)- गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने बाभळेश्‍वर परिसरात दाणादाण उडवली. या पावसाचा सर्वाधिक फटका बाभळेश्‍वर गावास बसला. महावितरणचे 250 पोल मोडून पडले.

 
तर मोठमोठी वृक्ष उन्मळुन पडले. खा. सदाशिव लोखंडे यांनी या नुकसानग्रस्त भागाची पहाणी करुन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे प्रत्यक्ष पाहणी करुन करावे अशा सुचना महसुल व कृषी विभागाला दिल्या.

 
खासदार लोखंडे यांनी बाभळेश्‍वर येथे कोकाटे वस्ती, बेंद्रे वस्ती, खळवाडी, म्हस्के वस्ती तसेच व्यावसायिकांची दुकाने तसेच परिसरातील नुकसान झालेल्या भागात भेटी दिल्या.

 
त्यांनी नुकसान ग्रस्त लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नुकसान झालेल्या डाळींब बागा, कांदा चाळी आदींची त्यांनी पहाणी केली. यावेळी अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामे करावे. मदत मिळवून देण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले. वीज वितरणचे सर्वाधिक नुकसान झाल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहे.

 
या कालावधीत पिण्याचे व जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून या भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करावे अशा सुचना दिल्या.

 
यावेळी सरपंच राजेंद्र म्हस्के, नायब तहसिलदार राहुल कोताडे, मंडल अधिकारी बी. के. सानप, तलाठी पी. एन. वाडेकर, कृषी अधिकारी खर्डे, गंगाधर बेंद्रे, बाळासाहेब पठारे, भाऊसाहेब मोरे, दादासाहेब पठारे, जगन्नाथ बेंद्रे, सुधिर म्हस्के आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*