पोलिसांना लुटण्याचा प्रयत्न

0

दुचाकींसह चौघे अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकात दरोडा प्रतिबंधक पथक सापळा रचून उभे होते. या दरम्यान दरोडेखोरांनी त्यांनाच लुटण्याचा प्रयत्न केल्याचा सिने स्टाईल प्रकार नागरिकांना पहावयास मिळाला. यात एमआयडीसी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून एक लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ओमकार नंदु गायकवाड, शुभम गणेश साळवे (रा. मोरया पार्क), अक्षय श्रीराम सोनवणे, राहुल जगन्नाथ रणवरे (रा. नवनागापुर) अशी आरोपींची नावे आहेत.
एमआयडीसी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कंपनीत काम करणार्‍या कामगारांना अडवुन त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम व दुचाकी काढून घेत असल्याची तक्रार सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे आली होती. त्यांनी ही टोळी पकडण्यासाठी साध्या वेशातील तीन पथके तयार केली होती. रविवारी (दि.28) 10 वाजण्याच्या सुमारास ही पथके सह्याद्री चौकात डोक्याला फडके बांधुन, हातात कामगारांचा डाबा, पायास साधारण चपला, फाटके कपडे, सर्वसामान्य कामगार दिसेल असे वेशांतर केले होते. दरम्यान पायी जात असताना हे दरोडेखोर तेथे आले. त्यांनी पोलीस पथकातील काहींना अडवुन त्यांच्याकडील पैसे काढून देण्यासाठी धीटाई केली. पोलिसांनी काही एक न बोलता त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे कामगार नसून पोलीस असल्याचा संशय येताच त्यांनी पळ काढला. एकास पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र अन्य आरोपी चकमा देऊन पळाले. याच वेळी विनोद चव्हाण यांच्या दुसर्‍या पथकेने अन्य आरोपींचा पाटलाग करून त्यांना बेड्या ठोकल्या. चौघांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी व अन्य मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी हद्दीत अशा प्रकारच्या चोर्‍या होत असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली आहे. जर अशा प्रकारे कोणाला लुटले जात असेल तर त्यांना कोणतीही भीती न बाळगता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
– अ‍ॅड. विनोद चव्हाण (सहायक पोलीस निरीक्षक)

 

LEAVE A REPLY

*