पोलिसांना खोटे ठरविण्याचा ‘उद्योग’ अंगलट

0

निलेश म्हसेविरोधात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

अहमदनगर – पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून केलेली अटक खोटी ठरविण्यासाठी मावळा संघटनेचा अध्यक्ष असलेल्या निलेश म्हसे याने पंटरलाच धमकी देत खंडणीची मागणी केली. दरम्यान पंटरांनी तेथून पळ काढत जीवाच्या भितीने थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी म्हसेविरोधात आणखी एक गुन्हा पोलिसांत दाखल झाला आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. अजमुद्दीन गुलाब सय्यद याने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांनी म्हसे पार्टनर असलेल्या जितेंद्र पाटोळे याच्या नागापूर, चेतना कॉलनी परिसरातील मटका अड्डयावर छापेमारी केली होती. या छापेमारीत निलेश म्हसे, जितेंद्र पाटोळे या दोघा बुकीसह अजमुद्दीन सय्यद, भाऊसाहेब रमाचंद्र वरुटे (47, रा. वडगाव गुप्ता), कय्युम अकबर सय्यद (25, रा. गजानन कॉलनी), कदम या पंटरांविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. शनिवारी सायंकाळी जितेंद्र पाटोळेने अजमुद्दीनला गजानन कॉलनी चौकात बोलावून घेतले. तेथे पाटोळे, महेंद्र कदम, भाऊसाहेब वरुटे आणि नीलेश म्हसे आधीपासूनच उपस्थित होते.
सायंकाळी मी बोलवेन तेथे ये, नाहीतर संपवून टाकीन अशी धमकी नीलेश म्हसेने अजमुद्दीनला दिली. सायंकाळी अजमुद्दीन सय्यद, कय्युम सय्यद, महेंद्र कदम, भाऊसाहेब वरुटे यांना घेऊन पाटोळे नीलेश म्हसे याला भेटायला माणिक चौकात गेले. तेथे नीलेश म्हसेने त्याच्याकडील टॅम्पपेपर दाखवून त्यावर सह्या करायला सांगितले. अजमुद्दीनने ते वाचले असता त्यात एमआयडीसी पोलिसांनी केलेली कारवाई खोटी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अजमुद्दीन, कय्युम, कदम, वरुटे यांनी त्यावर सह्या करायला नकार दिला. त्यानंतर नीलेश म्हसेने त्यांच्याकडे स्टॅम्पपेपरचे 20 हजार रुपये द्या, अशी मागणी केली.
नीलेश म्हसेने स्टँपपेपरवर जितेंद्र पाटोळेच्या सह्या अंगठे घेतले. इतरांना सह्या करण्यासाठी धमकावत असताना त्यांचे नीलेश म्हसेचे वाद झाले. त्यावेळी म्हसेच्या अनोळखी साथीदारांनीही सर्वांना जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. अजमुद्दीनने स्टॅम्पपेपरचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता नीलेश म्हसेने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पाटोळे वगळता इतर सर्वजण पळून गेले. नंतर सर्वांनी थेट एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून रितसर फिर्याद नोंदवली. खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बनावट नोटरी तयार करणे, खोटे पुरावे तयार करणे या कलमांन्वये पोलिसांनी म्हसे विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

अंगाशी आलेले बालंट टाळण्यासाठीचा उद्योग
मटकाबुकी जितेंद्र पाटोळे आणि मावळा संघटनेचा अध्यक्ष नीलेश म्हसे भागीदारीमध्ये अवैध मटका धंदा करतात. पोलिसांच्या छाप्यापासून सुटका करण्याकरीता त्यांना दरमहा पैसे द्यावे लागतील असे सांगत म्हसे हा मटका धंदेवाल्यांकडून परस्पर हप्ते गोळा करायचा, असे पाटोळे यानेच पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी नीलेश म्हसे यालाही या गुन्ह्यात आरोपी केले होते. मात्र, पोलिसांनी दमबाजी करुन बळजबरीने गुन्ह्यात नाव अडकवल्याचे लिहून द्या, असे म्हणत म्हसे याने नोटरी तयार करुन घेतली. त्या नोटरीवर सह्या करण्यावरून म्हसे व पंटर यांच्यात वादावादी झाली.

LEAVE A REPLY

*