पालकमंत्र्यांना खासदारांचे वावडे

0

डागवालेंचा प्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर भाजप अधिक बळकट करण्याकरीता खासदार दिलीप गांधी यांनी कंबर कसली असतानाच पालकमंत्री राम शिंदे यांना मात्र त्याचे काही देणेघेणे नाही. पक्ष संघटन वाढीचे  वावडे असल्यासारखे ते वागत आहे. सोमवारी (दि.8) प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमाकडे पालकमंत्री शिंदे यांनी उघडपणे पाठ फिरविली आहे. नगरसेवक किशोर डागवालेंसारख्या मातब्बरासह अनेकांच्या होणार्‍या भाजप प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम डावलून ते मतदारसंघातील तरडगाव व नान्नज (ता. जामखेड) येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. नगर शहर भाजपात खासदार गांधी व माजी शहरजिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अयभ आगरकर यांच्यातील गटबाजी सर्वश्रृत आहेच. शहर जिल्हाध्यक्ष असलेले खासदार गांधी यांनी या गटबाजीकडे दुर्लक्ष करत किशोर डागवाले यांना पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी थेट राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बोलविण्यात येणार आहे. जाजू, दानवे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.8) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भाजप कार्यालयासमोर पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय विश्रामगृह ते भाजप कार्यालयापर्यंत दानवे यांची उघड्या जीपमधून मिरवणूकही काढली जाणार आहे. थोडक्यात दानवे यांच्यासमोर गांधी (डागवालेंसह) शक्तीप्रदर्शन करणार आहेत. अर्थात पक्षांतर्गत कलहामुळे आगरकर गट या कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीत. ते कार्यक्रमापूर्वीच दानवे यांची भेट घेतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे व जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे खासदार गांधी यांनी सांगितले असले तरी पालकमंत्री मात्र गांधी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत. कोल्हार येथील कार्यक्रमात पालकमंत्री शिंदे व प्रदेशाध्यक्ष दानवे हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. तेथून पालकमंत्री राहुरी विद्यापीठात जाणार असून तेथे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट गावांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री जामखेड मतदार संघात जातील. तरडगाव वीज उपकेंद्राचे उद्घाटन व नान्नज येथील विकास कामांचे उद्घाटनाला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.
कोल्हारचा कार्यक्रम संपल्यानंतर दानवे थेट नगर शहरात येणार आहेत. मात्र त्यांच्यासमवेत पालकमंत्री नसतील. पालकमंत्र्यांचा तरडगाव येथील कार्यक्रम व डागवाले यांचा पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम एकाच वेळी आहे. अर्थातच पालकमंत्री शिंदे यांना खासदार गांधी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे वावडे असल्यामुळे ते नियोजीत दौरा बदलणार नाहीत. पर्यायाने ते गांधी आयोजित डागवाले यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत.

डागवाले यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी रावसाहेब दानवे यांनी येऊ नये यासाठी आगरकर समर्थकांनी फिल्डींग लावली आहे. डागवाले यांच्यासह माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, उद्योगपती बाळासाहेब सातपुते, वाहिद कुरेशी, ज्ञानदेव रासकर, राहुल रासकर हे भाजप प्रवेश करणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. आणखी काही प्रवेश होणार असून ते ऐनवेळी दिसेल असे गांधी यांनी पत्रकारांना सांगितले. हे प्रवेश मेरीटवर होत असल्याचे ते म्हणाले. शहरातील आणखी काही लोकांना भाजपात येण्याची इच्छा आहे, मात्र गांधी यांना पक्षात ते नको आहेत, असे सांगत आगरकर गटाने गांधी गटबाजी करत असल्याचा आरोप केला.

पक्ष विस्तारासाठी व संघटना बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनसामान्यापर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. शहरात आशादायी वातावरण निर्माण करायचे आहे. पक्षात कुठलीही गटबाजी नाही. – खासदार दिलीप गांधी.

सेनेला शह देण्याचा प्रयत्न
खासदार दिलीप गांधी यांनी सुपूत्र सुवेंद्र गांधी यांना नगरसेवक करून त्याचा राजकारणात प्रवेश करून दिला आहे. आता ते सुवेंद्रला प्रोजेक्ट करून विधानसभेच्या रेसमध्ये उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी शहरात पक्ष भक्कम केला जात आहे. भाजप बळकट होत असतानाच मित्र पक्ष असलेल्या सेनेलाही शह देण्याचा प्रयत्न गांधीकडून सुरू असल्याची चर्चा आहे.

या मांडवातून त्या मांडवात
डागवाले यांना भाजपात प्रवेश देताना काही शब्द दिला का? असा प्रश्‍न केला असता गांधी यांनी असा कोणताही शब्द दिलेला नाही ते विनाअट पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे डागवाले यांना पदाचा मोह आवरात नाही. त्यामुळे ते पदासाठीच भाजपात गेले असावेत अशी चर्चा आहे. आता डागवाले यांना कोणते पद मिळते की ते अनेक पक्षाच्या मांडवाखालून आलेले डागवाले भाजपाच्या मांडवात किती दिवस राहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सेना, मनसेनंतर पुन्हा सेनेत काही दिवस राहिल्यानंतर आता डागवाले भाजपवासी होत आहेत.

LEAVE A REPLY

*