पाथर्डीत तूर गैरव्यवहार, दोषींवर गुन्हे दाखल करा

0

भाजपाचा रास्तारोको, प्रांताचे आश्‍वासन

 

पाथर्डी (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तिसगाव येथे चालविल्या जात असलेल्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर मोठा गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रास्तारोको आंदोलनात करण्यात आली.आंदोलनात बाजार समितीच्या संचालक मंडळावर व तहसीलदार नामदेव पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे.

 

शहरातील नाईक चौकात तूर खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राहूल राजळे,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर,पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण व सुनील ओव्हळ,नगराध्यक्ष डॉ.मृत्यूजय गर्जे, आम आदमी पार्टीचे संयोजक किसन आव्हाड,नगरसेवक नामदेव लबडे, रमेश गोरे, प्रवीण राजगुरू, मंगल कोकाटे,शुभम गाडे, गोकुळ दौंड,रणजित बेळगे, मधुकर काटे, भगवान आव्हाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणाले,तीसगाव येथील तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्याऐवजी बाहेरील व्यापार्‍यांची तूर खरेदी करून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे.

 

नाफेड कडून आलेला बारदाणा बाजार समितीच्या संचालक मंडळांनी थेट व्यापार्‍यांना बारदाणा पोहोच केला आहे. व या बारदाण्यात भरलेली तूर थेट वखार महामंडळाच्या गोदामात परस्पर पाठवली आहे.या सर्व प्रकाराची सखोल चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येणार आहे असे खेडकर म्हणाले. आम आदमी पार्टीचे संयोजक किसन आव्हाड म्हणाले, तिसगाव येथील तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांच्या तुरी खरेदी न करता व्यापार्‍यांच्या तुरी खरेदी केल्या आहेत. याबाबत वेळोवेळी निवेदने, आंदोलने करण्यात आली. यानंतर व्यापार्‍यांच्या तूर खरेदी केलेल्या दोन ट्रक स्वतः ट्रक मालकाने पोलिसांच्या ताब्यात देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 22 एप्रिल रोजी शासनाने तूर खरेदी बंद केल्यावर केंद्रावरील मोकळा बारदाणा संचालक मंडळांनी रात्रीतून गायब केला होता.

 
शेतकर्‍यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे तक्रारी करून तिसगाव येथील तूर खरेदी केंद्रा समोर रस्त्यावर आंदोलन केले होते.यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलनाची दखल घेत बाजार समितीचे व खाजगी व्यापार्‍यांचे गाळे सील केले होते.मात्र त्यानंतर तहसीलदार पाटील यांनी शासनाला कोणताही अहवाल न पाठवता, कोणतीही सूचना न देता नायब तहसीलदार ससाणे,अकोलकर यांच्या बरोबर संचालक मंडळा बरोबर पोलीस बंदोबस्त पाठविला.

 
यावेळीही शेतकर्‍यांनी जोरदार विरोध केल्याने फक्त एकच गाळा उघडला गेला. तर 29 एप्रिल रोजी स्वतः तहसीलदार नामदेव पाटील यांनी उर्वरित सगळे राहिलेल्या गाळ्यांचे सील तोडून त्यांच्या ताब्यात देऊन टाकले.या सर्व प्रकाराला तहसीलदार पाटील यांचा हलगर्जीपणा व तूर खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराला पाठीशी घालत असल्याचे दिसून येते त्यामुळे सर्व संचालक मंडळाची व तहसीलदार पाटील यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलनात करण्यात आली.यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती.

 
त्यामुळे काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली.पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी आंदोलनाचा अंदाज घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

 

निवेदन घेण्यासाठी नायब तहसीलदार जयसिंग भैसडे हे हजर असताना.निवेदन प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांनी स्वतः येऊन घ्यावे यासाठी आंदोलक अडून बसले होते.काहीवेळा नंतर प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर आल्यानंतर आंदोलकांनी खेडेकर यांच्याकडे निवेदन दिले.चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

*