पाण्याच्या आंदोलनात महिलाही उतरल्या

0

आंदोलन दोन दिवस स्थगित; जिल्हाधिकार्‍यांकडे मांडणार गार्‍हाणे

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – कुकडी कालव्याचे आवर्तन सुरू असताना 132 मायनर चारीला सोडलेले पाणी अचानक बंद करून ते विसापूर मध्ये सोडले. यामुळे आमच्या फळबागा पाण्यावाचून जळाल्या आहेत. पाणी असताना असताना ते 132 ला एक थेंब सुद्धा मिळाले नाही. या चारीवरच्या पाण्याचे उद्धभव सुद्धा भरले नसल्याने आंदोलनात महिलांनी उडी घेतली. दोन दिवसांपासून तहसीलसमोर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी मध्यस्थी करून याबाबाबत दिोन दिवसांत सर्व आंदोलक शेतकर्‍यांसह जिल्हाधिकार्‍यांना भेटून पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
कुकडी कालव्याच्या सुरू असलेल्या आवर्तनाचे पाणी 132 मायनर चारीवरून पारगाव, बाबुर्डी, लोणी, श्रीगोंदा, म्हातारपिंप्री, लिंपणगाव, चोराचीवाडी या गावांच्या हद्दीतील शेतकर्‍यांना मिळते. मात्र मागील काही आवर्तनापासून या पाण्याचे नियोजन होत नसल्याने याठिकाणच्या अनेक शेतकर्‍यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. अगोदरच या चारीचे लाभार्थी पाण्याच्या मागणीसाठी आक्रमक असताना दिनांक 13 मे रोजी शेतकर्‍यांनी चारी सोडली एवढेच कारण पुढे करून सर्व पाणी बंद केल्याने नगरसेवक सुनील वाळके यांनी आ. राहुल जगताप यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर तहसील कार्यालयाला कुलूप लावले. पोलिसांनी अटक केल्यानंतर सात आंदोलकांनी एक दिवस जामीन नाकारला. त्यानंतर त्यांना जामीन झाला. 16 मेपासून शेतकरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनात आता या भागातील महिलांनी सहभाग घेतला. आमच्या जळत असलेल्या फळबागाना पाणी द्यावे, पाण्याचे उद्भव भरून द्यावेत अशी मागणी करत महिलांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला.
यामध्ये सगुणा बोरुडे, सुमनताई वाळके, उज्ज्वला मोटे, शालन नवले, लक्ष्मीबाई पोटे, रोहिणी मखरे, अनिता शिंदे, माधुरी ढवाण, चंद्रभागा मखरे, रेखा मोटे, कविता नवले यांचा समावेश होता.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी निवासी नायब तहसीलदार सीताराम आल्हाट आणि नायब तहसीलदार दुर्गे यांच्याशी चर्चा करून 132 मायनर वरील गावांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर बनलेल्या प्रश्नाबाबबत तातडीने जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठवून द्यावा, अशी मागणी केली. दोन दिवसांत जिल्हाधिकार्‍यांची आंदोलकांसह भेट घेऊन गार्‍हाणे मांडून पाण्याबाबत जर तिथे निर्णय न झाल्यास पुढील दिशा ठरविणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

 कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रजेवर गेले तर उपविभागीय अभियंता नॉट रिचेबल आहेत. श्रीगोंद्याचे तहसीलदार रजेवर आहेत. जबाबदारी असणार्‍या समकक्ष अधिकार्‍याने या आंदोलनाकडे जवळजवळ दुर्लक्ष केले असल्याने शेतकरी आक्रमक  होते. शेतकर्‍यांचे प्रपंच उद्धवस्त होत असताना पाण्याच्या राजकारणातून शेतकरी उद्ध्वस्त होताना जबाबदार अधिकारी आपली जबाबदारी झटकत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

बैलगाडी चालविणार्‍याच्या हातात विमान ः पाचपुते
कुकडीचे पाणी चालू असताना गेट तोडले म्हणून पाणी मिळाले नाही, अशी चर्चा आहे. विघनसंतोषी मंडळी चुकीची चर्चा करतात. स्वतःची जळणारी पिके पाहून पाणी मागणी करणे चुकीचे नाही. अगोदरच तालुका अन्याय सहन करत आहे. सध्या तालुक्याची अवस्था ही बैलगाडी चालविणार्‍याच्या हातात विमान चालवायला दिल्यासारखी झाली असल्याचा टोला सदाशिव पाचपुते यांनी लगावला.

LEAVE A REPLY

*