पाणी मीटर बसविण्याचे काम सदोष

0

तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या कामातील घोटाळा चव्हाट्यावर

तळेगाव दिघे (वार्ताहर) – अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत संगमनेर तालुक्यातील तळेगाव प्रादेशिक योजनेअंतर्गतच्या 21 गावांतील पाणीटाक्यांना मीटर बसविण्याचे सुमारे 14 लाख रुपये खर्चाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र ठेकेदार कंपनीने काही गावांना सदोष पाणीमीटर बसविले, तर काही गावांत मीटर बसविले नसल्याचे उघड झाल्याने पाणी मीटर कामातील घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. मीटरची चाचणी न घेताच मेहेरबान होत कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदार कंपनीस 70 टक्क्यांहून अधिक बिलाची रक्कम अदा केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
संगमनेर तालुक्यातील दुष्काळपीडित तळेगाव भागातील 21 गावांना पाणी पुरवठा करणार्‍या तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी चोरी व ग्रामपंचायतींकडून नळ कनेक्शन लपविण्यास आळा बसविण्यासाठी प्रत्येक गावातील मुख्य जलवाहिनीला पाणीमीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाचा ठेका नगर येथील आरडे इलेक्ट्रिकल कंपनीस देण्यात आला होता. 14 लाख रुपये खर्चाचे हे काम आहे.

या प्रादेशिक योजनेंतर्गत तळेगाव दिघे, पारेगाव खुर्द, नान्नजदुमाला, पारेगाव बुद्रुक, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, तिगाव, कासारे, कौठेकमळेश्‍वर, मेंढवण, मिरपूर, चिंचोलीगुरव, चोरकौठे, करूले, वडगावपान, मिरपूर, निळवंडे, पोखरीहवेली, माळेगाव हवेली या गावांमध्ये पाणीमीटर बसविणे अपेक्षित होते. तथापि ठेकेदार कंपनीने तळेगाव दिघे, नान्नजदुमाला, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, कासारे या गावात जलवाहिन्यांना मीटर बसविले नाहीत. वडगावपान व चिंचोलीगुरव गावांतील जलवाहिनीस बसविलेले मीटर बंद आहे.

उर्वरित गावांमध्ये बसविलेले काही मीटर सदोष आहेत. काम सदोष व अपूर्ण असताना व चाचणी न घेताच जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ‘मेहरबान’ होत ठेकेदार कंपनीस 70 टक्के बिलाची रक्कम अदा केली आहे. कामाच्या निविदेतील अटी व शर्थीनुसार आदेश निर्गमित झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत काम पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र ठेकेदार कंपनीने आठ महिने लोटले असतानाही काम पूर्ण केले नाही. शिवाय जे काम केले ते सदोष असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे योजनेअंतर्गतच्या गावांना मीटरने पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. काम सदोष झाल्याने मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी मीटर कामातील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी लाभार्थी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

ठेकेदाराकडून दुर्लक्ष
पाणी मीटर बसविणार्‍या ठेकेदार कंपनीने काम सदोष केले असून काही काम अपूर्ण ठेवले आहे. असे असताना कोणतीही चाचणी घेताच ठेकेदारास 70 टक्के बिल अदा करण्यात आले. ठेकेदारास वारंवार सांगूनही काम पूर्ण केले जात नाही, त्यामुळे मीटरने पाणीपुरवठा करता येत नाही, असे तळेगाव प्रादेशिक योजना समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*