पाचेगावात वीज पडल्याने बालकाचा मृत्यू

0

नेवासा तालुक्याला वादळाचा जोरदार तडाखा

 

पाचेगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वार्‍यांमुळे काही ठिकाणी झाडे पडली तर दोन ठिकाणी वीज कोसळली. पाचेगाव येथे जोरदार वादळी वार्‍याचसह पडलेल्या तुरळक सरींच्या वेळी वीज कोसळून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निंभारी येथे एका नारळाच्या झाडावरही वीज कोसळली. तर जळके बुद्रुक येथील शाळेवर झाड कोसळले.

 

याबाबत माहिती अशी की, पाचेगाव परिसरात शनिवार 6 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले व जोरदार वादळी वारे सुटून मेघगर्जनेसह पाऊस पडू लागला. पावसापासून बचावासाठी कांदे झाकण्यासाठी गेलेला किरण गोरक्षनाथ भिसे (वय 12) हा मुलगा कांदा झाकत असताना वीज पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी श्रीरामपूरच्या गंगाधर ओगले रुग्णालयात (साखर कामगार हॉस्पीटल) दाखल करण्यात आले असता तो मयत झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

 
मयत किरणचे वडील गोरक्षनाथ भिसे हे पाचेगाव-गुजरवाडी रोडला गट नं. 273 मधील शेतात वस्ती करून राहत आहेत. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे श्री. भिसे यांना 3 मुले व एक मुलगी अशी अपत्ये आहेत. त्यांनी शेजारील शेतात एक एकर कांद्याचे पीक घेतले होते. कांदा काढून त्याची पोळ घालण्यात आली होती. सायंकाळी वादळासह पाऊस सुरू झाल्याने मुलगा किरण कांदा झाकण्यासाठी गेला. त्याचवेळी त्याच्यावर वीज कोसळली.

 
गोरक्षनाथ भिसे यांच्या एकुलत्या एक मुलीचे रविवारी लग्न होणार होते. तिच्या हळदीचा कार्यक्रम सायंकाळी सुरू होता. त्यासाठी मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी त्यांच्या घरी आलेली होती. कांदा झाकण्यासाठी किरणबरोबरच जिजाबाई बनसोडे, पूजा बनसोडे व विकास बनसोडे हे देखील होते. मात्र ते एका बाजूला असल्याने बचावले.

 
वीज कोसळताच किरण गंभीररित्या भाजला गेला. त्याला ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला श्रीरामपूरला हलवण्यास सांगितल्याने तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.

 
रात्री उशिरा त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री पाचेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजे बहिणीच्या लग्नाच्या स्वयंपाकासाठी आणलेल्या सरपणाची लाकडे भावाच्या अंत्यसंस्कारासाठी वापरावी लागली. पाचेगाव परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

 

घटनास्थळी नेवाशाचे प्रभारी तहसीलदार प्रदीप पाठक, मंडल अधिकारी बी. के. वीर, तलाठी राजेंद्र भुतकर, पोलीस पाटील रंगनाथ पवार, सरपंच, उपसरपंच यांनी भेट देवून पंचनामा करण्यात आला. या दुर्दैवी घटनेतील कुटुंबाला शासनाकडून नियमानुसार मदत मिळवून दिली जाणार असल्याचे श्री. पाठक म्हणाले.

 

बहिणीच्या लग्नाच्या स्वयंपाकासाठीच्या सरपणात भावाचे अंत्यसंस्कार
मयत किरण भिसे याच्या बहिणीची शनिवारी हळद व रविवारी लग्न होते. हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच वादळ होऊन वीज कोसळली व भाऊ किरणचा मृत्यू झाला. लग्नाच्या स्वयंपाकासाठी आणलेल्या सरपणाची लाकडे किरणच्या अंत्यसंस्कारासाठी वापरावी लागल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांना गहिवरून आले.

LEAVE A REPLY

*