पाकिस्तान प्रथमच ‘फायनल’मध्ये

0
कार्डिफ । दि. 14 वृत्तसंस्था-बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त कामगिरीने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे ठोकताळे चुकवले.
आज झालेल्या उपांत्य लढतीत सुरुवातीला गोलंदाजांनी केलेला भेदक मारा आणि नंतर माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीरांनी दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडचा आठ गडी राखून धुव्वा उडवला.
या विजयासोबत पाकिस्तानने दिमाखात चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे.

इंग्लंडचे 212 धावांचे आव्हान पाकिस्तानने 36.1 षटकांत दोन विकेटच्या बदल्यात पार केले.

अझर अली (100 चेंडूंत 76 धावा) आणि फखर झमनने (58 चेंडूंत 57 धावा) 118 धावांची मजबूत सलामी देत पाकिस्तानच्या विजयाची पायाभरणी केली. झमनने 58 चेंडूंत 7 चौकार आणि एका षटकारासह 57 धावा केल्या.

झमनचे सलग दुसरे आणि एकूण दुसरे अर्धशतक आहे. झमन बाद झाल्यानंतर अझरने बाबर आझमसह दुस-या विकेटसाठी 55 धावा जोडताना संघाला आणखी विजयासमीप नेले.

अझर अली 76 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 100 चेंडूंत 5 चौकार आणि एका षटकारासह स्पर्धेतील दुसरे अर्धशतक साजरे केले.

बाबर आझमने (नाबाद 38) मोहम्मद हफीझसह (नाबाद 31) तिस-या विकेटसाठी 42 धावांची झटपट भागीदारी रचताना पाकिस्तानला आरामात जिंकून दिले.

तत्पूर्वी, हसन अलीसह (3 विकेट) जुनेद खान आणि रुम्मन रईस (प्रत्येकी 2 विकेट) या मध्यमगती त्रिकुटाच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडला 211 धावांत गुंडाळले.

सलामीवीर जॉनी बेअस्टरेसह तिस-या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील अनुक्रमे ज्यो रूट (46), कर्णधार इयॉन मॉर्गन (33) आणि बेन स्टोक्सने (34) थोडी फार चांगली फलंदाजी केली तरी मधली फळी कोसळली.

5 बाद 160 धावांवरून इंग्लंडचा डाव 211 धावांत संपला. तळातील पाच फलंदाजांना केवळ 51 धावांची भर घालता आली.

पाकिस्तानचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. इंग्लंडचे आठ फलंदाज झेलचीत झाले. दोघे ङ्गरनआऊटफ झाले. 49.5 षटकांत 211 धावांत यजमानांचा डाव संपला.

इंग्लंडने सलग तिस-यांदा उपांत्य फेरी गाठली. मात्र घरच्या मैदानावर सलग दुस-यांदा अंतिम फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

 

LEAVE A REPLY

*